Bookstruck

मिरी 49

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

डॉक्टर उंच होते. झपाझप पावले टाकीत होते. मिरी जणू पळत होती ! आणि तो पाहा अथांग समुद्र समोर उसळत आहे. धो धो करीत सार्‍या जगाला हाका मारीत आहे.

फिरायला गेलेली मंडळी येत होती आणि ही दोघे फिरायला जात होती. कोणी कुतूहलाने त्यांच्याकडे बघत होती. परंतु मिरीचे किंवा डॉक्टरांचे एका माणसाकडे सारे लक्ष होते. किनार्‍याने दोघे शोधीत गेले तो दूर एका खडकावर एक आकृती दिसली. दोघे धावतच गेली. त्यांनी त्या वृध्दाला धरले.

'आजोबा, येथे काय बसलात ? घरी चला.' मिरी म्हणाली.

'मुरारी आज यायचा होता ना ?'

'आज नाही. आजोबा, चला घरी.'

'आणि हे कोण ?'

'हे आपले डॉक्टर,'

'मला वर पाठविण्यासाठी आले वाटते. मुरारी आला असता एकदा म्हणजे केली असती तयारी वर जायची. तिकीट कधीच काढून ठेवले आहे. तिकीट मिळण्याची आता पंचाईत नाही.'

'चला उठा.'

'मुरारीचीच तू मिरी. ठीक. तो नाही जवळ तर तू तरी आहेस. त्याचीच ना तू होणार ? का कोणा श्रीमंताची राणी होणार ?'

'मी मुरारीचीच आहे. तुम्हा सर्वांची काळजी घ्यायला मला ठेवून गेला तो. उठा आता.'

म्हातारा उठला. तिघे निघाली. समुद्राच्या लाटा आदळत होत्या. अंधारात त्याचे हसणे दिसत होते. खडकावर लाटा आदळत नि स्वच्छ प्रकाशाचे झोत उडत आहेत की काय असे वाटे.

'डॉक्टर, तुम्ही येता आमच्या झोपडीत ? यशोदाआईंनाही जरा बघून जा. तुम्हांला मुद्दाम बोलावले तर त्यांना शंका येईल. सहज वाटेत भेटलो तो फिरत फिरत आलो असे म्हणा आणि त्यांनाही काही औषध वगैरे सांगा.'

« PreviousChapter ListNext »