Bookstruck

मिरी 55

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इतक्यात मिरी आली. यशोदाआई क्षीण स्वरात म्हणाल्या, 'मिरे, तू मुरारीला पत्र लिहिशील त्यात हे पत्रही घाल. माझी शेवटची इच्छा त्यात आहे हो बाळ.'

डॉक्टर तेथे बसले होते. मिरी मुकेपणाने बसली होती.

'आई, थोडा रस देऊ मोसंब्याचा ?' तिने विचारले.

'चमचाभर शेवटचा दे.'

मिरीने गोड रस चमचाभर दिला. आई शांतपणे पडून होती. मधून डोळे उघडून मिरीकडे ती पाही. मिरीच्या डोळयांतून अश्रू घळघळू लागले.

'डॉक्टर, मी दुर्दैवी आहे. दुर्दैवी.' त्यांच्या गळयाला मिठी मारून ती म्हणाली.

'उगी बेटा. शांत राहा. प्रभूची इच्छा प्रमाण.' ते तिला जवळ घेऊन म्हणाले.

पिंजर्‍यातील पाखराने 'मिरी ये, मिरी ये' अशी हाक मारली. आईने डोळे उघडले. ती मिरीला खुणेने जवळ ये म्हणाली. मिरी जवळ गेली. तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती ओढल्या आवाजात म्हणाली,

'मुरारी तू एक. सुखी व्हा. राम.' शेवटचे ते शब्द संपले. यशोदाआईंचे जीवन संपले. पित्यापाठोपाठ पुत्रीही गेली. भ्रमिष्ट पित्याचे स्वर्गात कसे होईल याची जणू तिला चिंता वाटली. मिरी-मुरारीचे मनात लग्न लावून ती माऊली गेली. यशोदाआईचीही पुढील सारी व्यवस्था डॉक्टरांनी केली.

एके दिवशी समुद्रतीरावर उजाडत मिरी गेली. ज्या जागांवर आजोबांचे, मुरारीच्या आईचे दहन झाले त्या जागी तिने फुले वाहिली. समुद्राच्या हजारो लाटांनी त्यांची राख, त्यांचे शेवटचे अवशेष आधीच नेले होते. अंदाजाने त्या ठिकाणी तिने फुले वाहिली. ती तेथे रडत बसली. 'मुरारीला मी काय लिहू ? महिन्यात दोघे निघून गेली. मी त्यांची काळजी घेतली नाही असे त्याला नाही ना वाटणार ? प्रभू साक्षी आहे. सागरा, तुझ्या लाटा आफ्रिकेकडे जाऊ देत नि मुरारीला माझ्या अश्रूंचा अर्थ सांगू देत. वार्‍यांनो, जा आणि मुरारीला मी कशी सेवा केली ते सांगा.' ती तेथे अशी दु:खमग्न बसली असताना तेथे डॉक्टर येऊन उभे होते. त्यांनी शांतपणे हाक मारली.

'मिरे...'

'कोण, डॉक्टर ? केव्हा आलेत ? बसा.'

'तू झोपडीत नव्हतीस तेव्हा तर्क केला की बहुधा येथे आली असशील.'

'येथे पुष्पांजली आणि अश्रूंची अंजली वाहिली.'

'समुद्राच्या लाटा येथे स्वच्छ फेसाची फुले उधळतात. रात्रंदिवस गीते गातात. भव्य गीते.'

'डॉक्टर, त्या झोपडीत आता मला राहवत नाही. मी शाळेच्या वसतिगृहात राहायला जावे म्हणते. मुलींमध्ये राहीन. त्यांना वळण लावीन. वेळ जाईल.'

« PreviousChapter ListNext »