Bookstruck

मिरी 58

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आज तिचा या शाळेतील तास शेवटचा होता. पुन्हा शाळेत ती शिक्षक म्हणून थोडीच येणार होती ? आज तिने हसतखेळत तास दवडला. शेवटी घंटा झाली. साश्रू नयनांनी मुलींचा निरोप घेऊन मिरी वर्गाबाहेर पडली. इतर शिक्षकभगिनींचा तिने प्रेमाने निरोप घेतला.

ती वसतिगृहात आली. मुलींबरोबर खेळली. जेवणे झाली. प्रार्थना झाली. प्रार्थनेनंतर मुलींनी मिरीला मानपत्र दिले. मिरीचे हृदय भरून आले. किती थोडया दिवसांचे येथील राहणे; परंतु मुलींचे प्रेम पाहून ती सद्‍गदित झाली. तिला उत्तर देववेना.

आणि सकाळी एका गाडीत बसून मिरी निघाली. तो एक लहान मुलगी मिरीला सोडीना. शेवटी मोठया कष्टाने तिला दूर नेण्या आले. मिरीच्या गळयात फुलांचे हार घालण्यात आले. कोणी तिला पुष्पगुच्छ दिले. शेवटी निघाली ती बैलगाडी. मुली बराच वेळ उभ्या होत्या. शेवटी त्या गेल्या. मिरी एकटीच निघाली; परंतु हृदयात अनेकांच्या स्मृती होत्या. तिला सारे पवित्र आठवले. देवाघरी गेलेली दुष्ट आत्या आठवली आणि आपण तिला शेवटी प्रेमाने चहा दिला हे मनात येऊन क्षणभर पावन असे स्मित तिच्या ओठांवर चमकले. पुन्हा ती गंभीर झाली. कृपारामकाका, यशोदाआई, मुरारीचे आजोबा, सारी प्रेमळ माणसे डोळयांसमोर येत होती. आणि परमुलुखातला एकाकी मुरारी ! आईची भेट त्याला लाभली नाही. दुर्दैवी मुरारी आणि ही दुर्दैवी मिरी ! पिंजर्‍यातील पक्षी मुका होता. तिने तो पिंजरा हातात घेतला.

'राजा...' तिने हाक मारली.

'मिरे ये, मुरारी ये' तो म्हणाला.

तिने त्या पिंजर्‍यावर आपले तोंड ठेवले.

« PreviousChapter ListNext »