Bookstruck

मिरी 60

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आपण लवकर भेटू. दीड वर्ष झपाटयाने जाईल. पिंजर्‍यातला राजा आहे ना ? माझी आठवण येईल तेव्हा त्याच्याजवळ जात जा. मिरे, तू कृतार्थ आहेस. सर्वांची सेवा करून पवित्र-पावन झालेले तुझे हात मी माझ्या हातात केव्हा बरे घेईन ? लवकरच. खरे ना ?

सुमित्राताईंना सप्रेम भक्तिमय प्रणाम. प्रिय डॉक्टरांचे उपकार कसे फेडायचे ? त्यांना सादर प्रणाम.

तुझाच

मुरारी

अशा अर्थाचे ते पत्र होते. सुमित्राताईंना सद्‍गदित कंठाने मिरीने ते वाचून दाखविले.

'गोड पत्र.'

'परंतु अधिक लांब का नाही लिहिले ?'

'मिरे, पुरुषांना पाल्हाळ येत नाही आणि मुरारी जरा संयमीच आहे. थोडी तो गोडी. एका रामनामात जी गोडी आहे, ती संबंध रामायणातही नसेल.'

मिरी दिवस मोजीत होती.

परंतु सुमित्राताईंच्या घरात अकस्मात मोठा बदल झाला.

कृष्णचंद्रांनी मद्रासला एका श्रीमंत विधवेशी पुनर्विवाह केल्याची बातमी आली. प्रथम त्या बातमीवर सुमित्राताईंचा विश्वासच बसेना. परंतु एके दिवशी पित्याचेच पत्र आले.

'प्रिय सुमित्रास आशीर्वाद.

युरोपची यात्रा रद्द करून पुन्हा नवीन संसारयात्रा मी आरंभिली आहे. तुझ्या पित्याने पुनर्विवाह केला आहे. तुमच्या या नवीन आईला बरोबर घेऊन मी लवकरच घरी येईन. तू आश्चर्य मानू नकोस. म्हातारपणी मी पुन्हा विवाह केला म्हणून नावे ठेवू नकोस. माझा दुबळेपणा मानून माझी कीव कर. मिरीस आशीर्वाद. आजीबाईस नमस्कार.
तुझे बाबा

« PreviousChapter ListNext »