Bookstruck

मिरी 71

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नीज राजा, नीज. प्रेमाच्या पिंजर्‍यात नीज. गोड गोड स्वप्नांत रंगून जा हो राजा !' असे ती म्हणत होती. तो कोणाची तरी पावले वाजली. कोण येत होते ? मिरीने वर पाहिले तो प्रेमा तेथे येऊन उभी.

'ये प्रेमा, बैस.'

'काय करतेस, मिरे ?'

'या राजाला झोपवत होते.'

'छान आहे पक्षी. बोलतो किती गोड !'

'प्रेमा, झोप नाही का येत ?'

'मिरे, रमाकांताना मी माझे हृदय देत आहे. देऊ ?­ '

'मी काय सांगू ?'

'ते किती प्रेम दाखवतात ! आमचे दोघांचे जीवन सुखाचे होईल असे वाटते.'

'परंतु थोडे दिवस वाट पाहा. घाई नको करूस.'

'मिरा, वसंताची झुळूक लागताच वृक्षवेलींना पालवी फुटते. तेथे लवकर-उशिरा प्रश्न का असतो ?'

'तेथेही पालवी हळूहळू फुटते. किती दिवस एकेक पान येत असते. एकेक कळी किती दिवस फुलत असते. निसर्गात सारे धीमेधीमे होत असते. म्हणूनच लहानशी कळी फुलल्यावर सारा सौंदर्यसिंधू तिथे उचंबळत असतो.'

'मिरे, वादळे का हळूहळू येतात ? भरती का हळूहळू येते ? भूकंप का हळूहळू होतात ?'

'प्रेमा, तू हे उत्पात सांगत आहेस. आणि तेथेही पाहू तर किती दिवसांपासून त्या गोष्टींचीही तयारी होत असलेली दिसेल. एक दिवस उजाडत फूल फुललेले दिसते. महिनाभर ती कळी होती. म्हणून का एकदम फुलले असे तू म्हणशील ? किडीची फुलपाखरे होतात. सुरवंट कोशात बसतात. त्यांतून फुलपाखरे बाहेर येतात. ती का एकदम आली ? अंडयातून पिलू बाहेर येते. ते का एका क्षणात पिलू झाले ? नवीन प्रकार, नवीन गुणधर्म दिसले तरी त्यांचीही वाढ हळूहळूच होत होती असे दिसून येईल. तुझ्या प्रेमाची वेल हळूहळू वाढो, घाई नको.'

'मिरे, मी तर स्वप्नसृष्टीत जणू आहे. रमाकांताचे बोलणे, हसणे सारे सारखे मनासमोर असते. त्यांनी आज एक पत्र दिले. किती भावनामय आहे ते.'

'जर खरोखरच त्यांचे तुझ्यावर प्रेम असेल, तर मला आनंदच आहे. तू भोळी आहेस. तुझे डोळे जगावर विश्वास टाकणारे आहेत. तुझा विश्वास धन्य ठरो, कृतार्थ ठरो.'

« PreviousChapter ListNext »