Bookstruck

मिरी 82

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'परमेश्वराला म्हणूनच 'कवीनां कवि:' असे म्हटले आहे. कारण, तो चराचराचे हृद्‍गत जाणतो. तृणपर्णासाठीही दवबिंदू ढाळतो.' सुमित्राताई म्हणाल्या.

'तुम्ही सर्वच काव्य बोलत आहात. मीच एक तुमच्यात अरसिक आहे.'

'तुमच्यामुळे तर या सर्वांच्या वाणीला पल्लव फुटले आहेत. आमच्या काव्यांना स्फूर्ती देणारे तुम्ही आहात.' मिरी म्हणाली.

'डॉक्टर, तुम्ही काही म्हणा, या जगात माझी कशावरच श्रध्दा नाही. या जगात कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर श्रध्दा ठेवावी ? सारा असार पसारा आहे.'

'जे शुध्द आहेत त्यांच्यावर श्रध्दा ठेवावी.'

'या शुध्दांना कोठे धुंडाळायचे ? सर्व बजबजपुरी नि घाण. मोठमोठया मंदिरातून जावे तो तेथे गेल्यावर किळस येते. यात्रांची ठिकाणी म्हणजे व्यसनांचे, व्यभिचारांचे नरक वाटतात. कोठे ठेवायचा विश्वास ? तुम्ही या मंदिरात जाऊन देव पाहणार ? सर्वत्र दंभ आहे. देवदेव म्हणणार्‍यांजवळ नेमका देव नसतो. टिळे, माळा, जपजाप्य, सारी सोंगे. डॉक्टर, देवाला न मानणारा एक गृहस्थ एकदा मी पाहिला होता. परंतु लाखो सनातनींना कुरवाळूनही असे निर्मळ जीवन हाती आले नसते. देवधर्म न मानणार्‍यांजवळच थोडाफार देवधर्म असण्याचा संभव आहे. बाकी सारा रूढींचा पसारा. वरपांगी देखावे. देवाला मानणारे मानवांना तुडवायला निघतात. देव, कोठे आहे देव ?'

'जेथे सुजनता दिसेल, चांगुलपणा दिसेल, तेथे देव पाहा तेथे विश्वास ठेवा. तेथे श्रध्दा ठेवा. श्रध्दा ठेवण्यासारख्या काही तरी व्यक्ती आपणास भेटतातच. या जगात सारे वाईटच असते तर हे जग चालले असते का ? शरीर सारेच सडलेले असेल तर तेथे प्राण राहू शकेल का ? हे जग चालले आहे यावरूनच जगात साधुता आहे. या जगात केवळ खाटीकखानेच नाहीत. अशी शिवालयेही आहेत.'

बोलत बोलत मंडळी शिवालयाजवळ आली. थंडगार वारा येत होता. मिरी घामाघूम झाली होती.

'मिरे, घाम पूस. दमलीस ना ?' डॉक्टरांनी विचारले.

'मिरी, किती छान नाव ! हा घे रुमाल. पूस घाम.' तो पाहुणा म्हणाला.

'माझ्याजवळ आहे.' मिरी म्हणाली.

पाहुण्याने आपला रुमाल खिशात ठेवला. सुमित्रा शांतपणे बसली होती. डॉक्टरांनी खिशातून लिंबे काढून चुंफायला दिली. पाहुण्याच्या खिशात लिमलेटच्या गोळया होत्या. थोडा वेळ बसून मंडळी निघाली. खाली उतरताना त्रास होत नव्हता.

भोजन करून मंडळी धर्मशाळेत पडून राहिली. सुमित्रा, मिरी, डॉक्टर सर्वांनाच गाढ झोप लागली. परंतु तो पाहुणा कुठे आहे ? मिरी जागी झाली तो तिला पाहुणा दिसेना. तिने सर्वत्र पाहिले. ती बंदरावर गेली. तिने चौकशी केली.

'ते पाहुणे गेले.' कोणी तरी सांगितले.

'कसे गेले ?'

'एक होडी जात होती पलीकडे. ते गेले.'

'आम्ही उद्या तिकडे जाणार होतो. ते एकटेच कसे गेले ?'

मिरी धर्मशाळेत परत आली. सर्व मंडळी उठली. पाहुण्यांचे अकस्मात जाणे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. सायंकाळी तीरावर तिघेजण हिंडली. नारळाचे पाणी प्यायली. कोवळे खोबरे मिरीने खाल्ले. इतक्यात मिरीला रंगाच्या पेटीची आठवण झाली. तिने ती आणली. एका खडकावर जाऊन ती बसली. समोरचे निसर्गदृश्य ती चितारीत बसली. परंतु आकाशात इतके रमणीय रंग पसरले की कुंचले तिच्या हातातच राहिले. ती बघतच राहिली. समुद्राच्या पाण्यावर त्या रंगांचे प्रतिबिंब पडले होते. सौंदर्यदेवता जणू लाटांवर नाचत होती. आकाशात विहरत होती.

« PreviousChapter ListNext »