Bookstruck

मिरी 92

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'जा आता घरी.'

'तुम्ही नाही येत ? चला.'

'आता नाही येत. योग्य वेळी येईन.'

'तुमचे नाव काय ?'

'हळूहळू कळेल. तू जा. सुमित्राताई रडत असतात.'

'तुम्ही त्यांच्याकडे जाता ?'

'मला दुरून कळते. जा बेटा, तुझी श्रध्दा ठेव. ज्या अर्थी तुला जगावेसे वाटले, जगावेसे वाटत आहे. त्या अर्थी तुझा हृदयदेवही तुला मिळणार, असे मला वाटते. अशी बघू नकोस. मी सारे जाणतो. जा, बाळ.'

तो पाहुणा निघून गेला. मिरी आली. बंगल्यात शिरली.

'मिरी, मिरी.' प्रेमाने टाळया वाजविल्या. ती वरून धावतच आली. तिने मिरीला मिठी मारली.

'मिरे, तू आलीस ?'

'हो, आले, मृत्यूच्या घरून आले.'

'मिरे ये, मुरारी ये' असे पक्षी सारखे म्हणत असतो. मी त्याची काळजी घेतली. चल वर. सुमित्राताई खाली येत आहेत. त्या बघ.'

मिरी धावत जाऊन सुमित्राताईजवळ उभी राहिली. क्षणभर कोणाला बोलवेना.

'मिरी, आम्हांला वाचवून तू निघून जाणार होतीस. होय ना ? मला अंधारात सोडून जाणार होतीस.'

'परंतु देवाने परत आणले.'

'देव दयाळू आहे.'

'तुमच्याप्रमाणे मीही जीवन कंठीन.'

घरात सर्वांना आनंद वाटला. परंतु मिरी दु:खीच होती. तो पिंजरा जवळ घेऊन ती बसे. तो पक्षी नाचे, बागडे. 'मुरारी ये' म्हणे.

'कोठे आहे मुरारी, राजा ?' ती म्हणायची नि डोळे पदराने पुसायची.

मुरारी गावात आला होता. एका हॉटेलात तो उतरला होता. त्याला स्वत:चे घर नव्हते. मुरारी केव्हा येतो या गोष्टीकडे त्या अपरिचित पाहुण्याचे लक्षच होते. तोही त्या हॉटेलमध्ये गेला. मुरारी तेथे एकटाच होता.

'आपणच का मुरारी ?' त्या पाहुण्याने विचारले.

'हो का बरे ?'

'आपले नशीब थोर आहे.'

'कशावरून ?'


'त्या श्रीमंत व्यापार्‍याचे आफ्रिकेतील तुम्ही भागीदार. हो ना ?'

'हो.'

'एक आनंदाची बातमी ऐकली.'

'कोणती ?'

'त्या व्यापार्‍याच्या मुलीबरोबर तुमचे कदाचित लग्नही होईल.'

'माझे लग्न ?'

'हो लोक म्हणतात.'

'बावळट आहेत लोक.'

« PreviousChapter ListNext »