Bookstruck

मिरी 95

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'तुमचे तोंडही ती बघणार नाही. तिला तुम्ही आंधळे केलेत.'

'मी मुद्दाम तिच्या डोळयात अ‍ॅसिड घातले, फेकले, असे तिलाही वाटते का ?'

'होय, तिलाही वाटते. विचारतोस काय ? तिचा बाप तिच्याशी बोलण्याची बंदी करील म्हणून तू असा सूड उगवलास. दुष्टा, हो चालता.' ते शब्द ऐकून मला मेल्याहूनही मेले झाले. मी मुद्दाम अ‍ॅसिड फेकले असे सुमित्रालाही वाटणार नाही अशी मला श्रध्दा होती. परंतु तिनेही माझ्यावर तसा आरोप केला आहे असे ऐकून मला सारे निस्सार वाटू लागले. मी बाहेर पडलो. परंतु त्या घरात माझी आणखी एक ठेव होती. आईची अंगठी नि काही पैसे एकत्र बांधलेली अशी माझी एक पुरचुंडी त्या घरात होती ! मी हळूच त्या घरात शिरलो. माझी ती पुरचुंडी घेऊन मी गेलो. जगात मला माझे असे कुणी नव्हते. मी निराश झालो होतो, मी समुद्रकिनार्‍यावर जाऊन बसे.

एके दिवशी एक गलबत कोठे तरी दूर जाणार होते. त्याचा मालक धाडशी खलाशी होता.

'कुठे जाणार तुमचे गलबत ?' मी विचारले.

'लांब लांब. अमूकच ठिकाणी असे नाही. या गलबतातून मी जगाची यात्रा करणार आहे. माझा स्वभाव साहसी आहे. हे खलाशी माझ्याबरोबर येत आहेत. माझी बायकोही माझ्याबरोबर आहे. माझी मुलगी आहे. समुद्र हे आमचे दैवत.'

'मी येऊ तुमच्या गलबतात ? सांगाल ते काम करीन. कोणी आजारी पडला तर सेवा करीन.

'आणि तुफान झाले, गलबत फुटले तर ?'

'माझ्यासाठी रडायला कोणी नाही.'

'चल तर आमच्याबरोबर.'

'मिरे, त्या गलबतात मी चढलो. एके दिवशी ते गलबत निघाले. किती तरी दिवस समुद्रातून आम्ही जात होतो. परंतु अकस्मात गलबतावर रोगाची साथ पसरली. तो मालक आजारी पडले. त्याची बायको आजारी पडली. दुसरेही पुष्कळ खलाशी आजारी पडली. भराभर माणसे मरू लागली. आम्ही मेलेल्यास समुद्राच्या स्वाधीन करीत होतो आणि तो खलाशीही मरणार असे वाटले. त्याने मला जवळ बोलावले.

'भल्या माणसा, मी मरणार. माझ्या मुलीचा तू सांभाळ कर. तू तिला आधार दे.'

मी त्याला वचन दिले. तो मेला त्याची बायकोही मेली. त्याची ती पोरकी मुलगी. ती सारखी रडे. समुद्रात उडी टाकू बघे. मी तिला आवरीत असे. मी तिला प्रेमाने जेवू घाली. ती निजली की नाही बघत असे.

आमचे गलबत शेवटी एका बेटाला लागले. आमची यात्रा आम्ही तेथेच संपविली. त्या मुलीशी मी पुढे लग्न लावले. मी तेथे काम करू लागलो. लहानशी झोपडी बांधली, आणि बाळ, एके दिवशी तू जन्माला आलीस. नक्षत्रासारखी तू वाढत होतीस.

एकदा त्या बेटावर एक व्यापारी आला. तो दुसर्‍या एका बेटावर राहत होता, त्याला तेथे नवीन वसाहत करायची होती. नवीन लागवड करायची होती. त्याला मजूर हवे होते. आम्हांला तो पुष्कळ सवलती देणार होता.

'मी त्या बेटात जाऊन येतो. तेथे कशी काय परिस्थिती आहे हे पाहून येतो.' तुझ्या आईला मी म्हटले.

'नका तुम्ही जाऊ. येथेच बरे.' ती म्हणाली.

'मी काय फसवीन असे वाटते ? आईने दिलेली अंगठी तुझ्या बोटात घालतो. या अंगठीहून प्रिय नि पूज्य मला काही नाही. त्या अंगठीची शपथ घेऊन सांगतो की मी परत येईन. तिकडे चांगले असले हवापाणी, तर तुम्हांला तिकडे घेऊन जाईन. नाही तर येथेच सुखाने नांदू.'

तुझ्या आईची मी समज घातली. तुझा मुका घेतला. तू आपले चिमुकले हात माझ्या गळयाभोवती घातलेस. शेवटी तुझ्या आईजवळ तुला देऊन मी निघून गेलो.

« PreviousChapter ListNext »