Bookstruck

मिरी 98

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'बाबा, बाबा, माझे बाबा-' ती स्फुंदत होती. पित्याने तिला हृदयाशी धरले. त्याच्या डोळयांतील अश्रूंचा तिला अभिषेक होत होता.

'तू माझा तिटकारा नाही करत तर.' त्याने धीराने विचारले.

'काय विचारता बाबा ? कोणते असे पाप तुमच्या हातून घडले ? तुम्ही पवित्र आहात, थोर आहात.'

'मी आता जातो, बाळ.'

'आता जाऊ नका. घरात चला. वनवास संपो. सुमित्राताईंना किती आनंद होईल ! तुमच्या स्मरणावर त्या जगत असतात. तुमच्या प्रेमाची करुणकथा त्यांनी मला सांगितली होती.'

'तिला मी अंध केले असे नाही तिला वाटत ?'

'नाही, नाही, 'मी असे कसे समजेन' असे त्या म्हणाल्या. माझे प्रेम का इतके क्षुद्र होते ? असे त्या म्हणाल्या. तुम्ही भेटाल असे त्यांना वाटत होते. बाबा, चला ना आत. तुमच्या मांडीवर डोके ठेवून मला निजू द्या. मला झोपवा. खलाशांची गाणी म्हणा. समुद्राचे मला इतके वेड का, ते आज मला कळले. माझी आई खलाशाची मुलगी होती. बाबा, चला ना आत.'

'आज नको. मी उद्या येईन.'

'खरेच !'

'हो बाळ, जा आता तू. मी आज सुखाने झोपेन. तुझ्या श्रध्देचा विजय असो.'

'बाबा, आपण येथेच बसू.'

'नको, पाऊस पडलेला आहे. येथे सारे गार आहे, बाळ.'

'मला बाधणार नाही. वार्‍यांची, सागरलहरींची मी कन्या आहे.'

'माझे ऐक. हा वारा बाधेल. मुरारीसाठी तरी प्रकृतीला जप.'

'आणि तुमच्यासाठी नको का ?'

'मी आता म्हातारा झालो.'

'बाबा, मुरारी काय म्हणाला ?'

'म्हणाला, 'सारे त्रिभुवन कोणी मला दिले नि मिरीचा त्याग कर म्हणाले, तरी मी मिरीला जवळ करीन. त्रिभुवन संपदा झुगारीन. सारे मंगल होईल. जा, आनंदाने झोप. उद्याचा सूर्य सुंदर उगवेल. जा आता बाळ.'

त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला. पुन्हा एकदा त्याने तिला हृदयाशी धरले आणि ती मागे बघत बघत गेली. शांतारामही गेला. मिरी आपल्या खोलीत बसली. ते पत्र तिने पुन्हापुन्हा वाचले. आपली आई कशी बरे असेल, तिचे डोळे माझ्यासारखे मोठे असतील का, असे तिच्या मनात आले. शेवटी आनंदाने ती अंथरुणावर पडली. परंतु मुरारीची मूर्ती डोळयांसमोर येऊन पुन्हा ती गंभीर झाली. शेवटी केव्हा तरी तिचा डोळा लागला.

परंतु पहाटेसच ती उठली. बागेत गेली. तिने सुंदर सुगंधी फुले तोडली. का बरे ? तिला आठवण आली. यशोदाआईंची आठवण आली. मुरारीच्या आजोबांची आठवण आली. ती समुद्रावर गेली. सर्वत्र शांत होते. फक्त लाटांचा आवाज दुरून कानांवर येत होता. ओहोट होता. ज्या ठिकाणी यशोदाआईचा देह अग्नीच्या स्वाधीन करण्यात आला होता, त्या ठिकाणी ती उभी राहिली. तिने प्रणाम केला. त्या ठिकाणावर पुष्पांजली वाहिली. तेथे डोळे मिटून ती जणू क्षणभर ध्यानस्थ बसली. इतक्यात कोणी तरी तिच्या मागे येऊन तिचे डोळे झाकून उभे राहिले. कोण होते ? मिरीने डोळे सोडवले. तो तिच्याजवळ तिचा मुरारी उभा होता.

'मिरे, आपण दोघांनी पूजा केली असती. तू एकटी का आलीस ?'

'म्हटले तू माझ्याबरोबर येशील की नाही ?'

'मिरे, तू का माझा तिरस्कार करतेस ?'

'मुरारी, आपण बहीणभाऊ म्हणून तरी राहू.'

'मिरे, का तुझी खरेच अशी इच्छा आहे ? तुझ्यावर माझे प्रेम मी लादू इच्छित नाही. किती झाले तरी गरीब यशोदाआईचा मी मुलगा. परंतु तुझ्याकडे माझे सदैव डोळे होते. तू आजोबांची सेवा केलीस; आईची सेवा केलीस. आईने तुझ्यावर प्रेम करायला मरता मरता मला कळविले. आईची शेवटची रक्षा येथेच पडली. या पवित्र स्थानी प्रतिज्ञेवर मी सांगतो की तुझ्याशिवाय मुरारीच्या हृदयात दुसर्‍या कोणासही कधी स्थान मिळाले नाही.'

« PreviousChapter ListNext »