Bookstruck

प्रवेश पहिला 1

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

(नाटिका)

नांदी

(भूप, एकताल, 'परब्रह्म परमेश्वर')
बाल- बाल परमेश्वर - सगुणरूप चिदानंद ।
मना नाना उठति तरंग; वधुनि लागतोच छंद ॥ ध्रु. ॥
ईशा हेंचि तव सेवन । पुंडरीक- नयनान ।
लोल गोल तनु - धारी ॥ भज गमे सौख्यकंद ॥ १ ॥
प्रवेश पहिला

[ एक महाराची झोंपडी, एका घोंगडीवर एक बारा तेरा वर्षाचा मुलगा आजारी पडला आहे. खोलींत आजूबाजूला सर्वत्र अडगळ, म्हणजे कांहीं मडकीं, कांहीं काटक्या असें सामान पडलें असून, मुलाचा बाप त्याच्या जवळ बसला आहे ]

पांडू - बाळ, जरा बरं वाटतं ना रे आतां तुला ? अजून तुझं कपाळ तर कसं अगदीं तापलेलं आहे. काय करावं, कांहींच समजत नाय, देवाजीच्या मनांत काय हाय ते कुणास ठावं ! देवा भगवंता, माझ्या पोराला बेगीन गुण पाडलास तर पांच नारळ फोडीन रे तुला ! बाळ, असं का रे करतोस ?

राघू -  अयाई, आई ! बाबा, बाबा ! बय कुठं गेली ? तहान - फार तहान लागली, बाबा! पाणी द्याना घोंटभर ! पाणीबी तुम्ही नाहीं देत; तुम्ही तरी कोठून द्याल पाणी ? भरूं देतील तर ना विहिरीवर ?

पांडू
- बाळ, थांब जरा, अशी अगदीं जिवाची तगमग नको करूं, बघ, पाणी आणलं हाय हो लांब जाऊन. (मडक्यांतील पाण आणतो ) हं, कर आ; हें घे पाणी. (ओततो.) पुरे ना आतां ? जरा स्वस्थ पडून रहा. (मुलाची तगमग पाहून बाप स्वत:शींच बोलतो.) पोराची तर ही अशी दशा ! घरांत वीख खायला दिडकी नाय - तर औषधपाण्याला कुठून आणणार पैसा ? डाक्तर कुठून आणूं ? आणि आमच्या म्हाराच्या घरीं तो येईल तरी कसा ! देवा, आम्ही असंच हालांत दिवस काढावं व मरून जावं का रे ?

Chapter ListNext »