Bookstruck

आस्तिक 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वृध्द सुश्रुता एकटीच घरांत बसली होती. ती सचित होती. तिच्या मुद्रेवर अपरंपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हें दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवांच्या रेषा तेथें उमटलेल्या असतात. कांही रेषा अस्पष्ट असतात; काही खोल व स्पष्ट असतात. डोळे म्हणजे तर जीवनांतील अनुभवाचे भरलेले डोह.

"सुश्रुताआजी, तुम्ही आज हंसत कां नाहीं ? आमच्याकडें आल्यांत कां नाहीं ? आज आम्ही नदीवर गेलो होतो. तेथे मारामारी झाली. तुम्हाला कळलें का ?' शेजारच्या कार्तिकाने विचारले. 'कार्तिक, कोणाची झाली मारामारी ? तुला नाही ना लागलें ह्या लहान लहान मारामा-यांतून पुढें भयंकर युध्दे होतात. ठिणग्यांतून वणवे पेटतात.' ती म्हणाली.

"त्या पूर्वीच्या युध्दाच्या तुम्ही गोष्टी सांगूं लागलां म्हणजे आम्हाला वाईट वाटतें. एखादे वेळेस मला चेवहि येतो. वीर व्हावें असें मला वाटतें. वत्सलेच्या आजोबांची ती तलवार तुम्ही मला द्याल ? वत्सलेच्या वडिलांचें तें धनुष्य मला द्याल ? वणव्यांत ना ते सांपडून मेले ?' कार्तिकानें पुन्हां आठवण करून दिली.

"होय, कार्तिक. माझा तो गुणांचा बाळ, तो एकुलता एक माझा मुलगा, वणव्यांतून नागांची मुलें वांचवतां वांचवतां जळून मेला. नागांच्या एका लहानशा वसाहतीला कांही आर्यांनी आग लावली. वत्सलेचा पिता, तो माझा बाळ रानांत शिकारीला गेला होता. तो परत येत होता. त्याने आक्रोश ऐकला. त्या ज्वाला पाहिल्या. तो धांवत गेला. त्यानें आगींत उडी घेतली. एका मातेचीं मुलें घरांत होती. ती मुलें आपल्या डोळयांसमोर आगींत जळून जाणार ह्या विचारानें ती मृर्च्छित झाली. परंतु माझा बाळ शिरला त्या आगींत. अंगावरच्या वस्त्रांत तिचीं दोन मुलें गुंडाळून तो बाहेर आला. आपल्या बाहूत त्यानें ती घेतलीं. त्या मातेजवळ ती दोन मुलें त्यानें ठेवली. रत्नाकर घरीं आला, परंतु आगींत भाजून आला होता. उपचार केला; परंतु तो मरण पावला. मी पुत्रहीन झालें. परंतु दुस-या मातेच्या जीवनांत त्यानें आनंद ओतला. तो खरा मातृपूजक जो दुस-या मातांचीहि पूजा करतो, तो खरा धर्मपूजक जो दुस-या धर्माबद्दलहि आदर दर्शवितो. वत्सलेचा पिता नागांची निंदा करीत नसे. नागपूजेच्या वेळी तोहि त्यांच्या उत्सव-समारंभास जाई. आर्यजातीय लोक त्याचा तिरस्कार करीत, त्याला नांवे ठेवीत. परंतु तो शांत राही. गुणी होता माझा बाळ.' सुश्रुतेच्या डोळयांतून पाणी आलें.

"तुम्ही वत्सलेच्या आईला कां जाऊं दिलें ? जशा तुम्ही राहिल्यात तशा त्या राहिल्या असत्या. आई नाहीं म्हणून वत्सला एकदां आमच्याकडें रडली होती.' कार्तिक म्हणाला.

"माझे पति कुरुक्षेत्रावर पडले. ते लढाईला गेले तेव्हा माझ्या पोटांत बाळ वाढत होता. जातांना ते म्हणाले. 'मी मेलों तर सती जाऊं नकोस. बाळ होईल, त्याला वाढव. त्याच्या सेवेंत माझीच सेवा करशील. कुळाचा तंतु तोडूं नकोस. परंपरा चालली पाहिजे. अशानेंच पितृऋण फिटतें.' मीं म्हटलें, 'असें अशुभ नका बोलूं, विजयी होऊन तुम्ही याल.' ते लढाईला गेले. परंतु पुन्हां त्यांची भेट झाली नाहीं. समरांगणावर ते पडले. त्यांची आज्ञा मी पाळली. बाळ वाढवला. कसा दिसे सुंदर ! त्याचे नांव रत्नाकर ठेवले होते. तळहातावरील फोडाप्रमाणें त्याला मी वाढविलें.

« PreviousChapter ListNext »