Bookstruck

आस्तिक 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"राजा, चर्चा मला आवडत नाहीं. तो काथ्याकूट असतो. सत्य चर्चेनें मिळत नसतें. तें ज्याच्या त्याच्या बुध्दींत स्वयंभू जन्मत असतें. मी जातों. योग्य वेळ येईल. काळ अनंत आहे व पृथ्वीहि विपुल आहे. माझ्या विचारसरणीचे द्रष्टे उत्पन्न होतील. वाट पाहात बसणें म्हणजेहि सेवाच असते. तूंहि विचार कर. तुझा पुत्र जनमेजय तरी एके दिवशीं माझ्या हेतूंची पूर्णता करील. तो राज्यावर येईल व पृथ्वी निर्माण करील. मला त्याविषयी शंका नाही.' वक्रतुंड तो-याने म्हणाला.

"म्हणजे माझ्या मरणाची वाट पाहतां की काय तुम्ही ? माझा वध करण्याची तर नाहीं ना खटपट चालली ?' हंसून परीक्षितीनें विचारिलें. "नागलोक संघटना करीत आहेत. तेच एक दिवस तुला गिळंकृत करतील. असाच असावध राहा. सर्पपूजकांना अशीच सवलत दे. साप चावल्याशिवाय राहत नाहीं. तुम्ही नागांना जवळ घेऊं पाहाल. परंतु नाग चावण्यासाठी मात्र येतील. ते द्वेष विसरत नाहीत, सूड सोडीत नाहींत. खांडववनातील वांचलेला तो एक तक्षक कुळांतील तरुण नाहीं का कर्णाजवळ गेला व म्हणाला, 'अर्जुनाला मारण्यांसाठी मीहि तुला साहाय्य करीन.' परंतु कर्णानें त्याला झिडकारिलें. अशी ही खुनशी जात आहे. तिचा नि:पात केला पाहिजे. ती ठेंचली पाहिजे. तुला नसेल तें धैर्य तर तुझा पुत्र तें धैर्य दाखवील. कोंवळया वृत्तीच्या लोकांकडून क्रान्ति होत नसते. समाजांत कोणतीहि उलथापालथ ते करूं शकत नसतात. मनांतून त्यांची इच्छा असली, तरी त्यांचा हात नागांवर वज्रासारखा पडेल असें मला वाटतें. माझे विचार त्याला पटतात, तुलाहि पटतें तर अधिक सत्वर कार्य  झाले असते. असो. येतों मी. या चित्रशाळेंतील ते खांडववनाची होळी दाखविणारे चित्र, तें फक्त पाहा. आर्यांचा विजयरथ त्या दिशेंने, तया मार्गाने गेला पाहिजे. समजलें ना ?' असें म्हणून वक्रतुंड निघून गेला.

वातायनांत उभा राहून परीक्षिति पाहात होता. जोराने पावलें टाकीत तो वक्रतुंड जात होता. जणूं पायांखाली नागांना चिरडीतचहोता. वक्रतुंड गेला. प्रासादासमोरील उपवनांतून गेला. परीक्षिति दूर पाहात होता. आकाशांतील सूर्य मेघमालांनी झाकोळून गेला होता. विचार करीत तो उभा राहिला. 'माझ्या आयुष्यांतच मला भयंकर प्रकार पाहावे लागणार का ? माझ्या राज्यांत यादवी सुरू होणार का ? माझा पुत्रच हा द्वेषाग्नि पेटवण्यास कारणीभूत होणार का ? त्याच्या आधींच माझे डोळे मिटले तर किती सुरेख होईल ! 'असे विचार त्याच्या मनांत आले व त्यानें आकाशाकडे वर हात करून 'देवा, मला ने' म्हणून प्रणाम केला !

"वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना ? ऊठ, बाळ दिवस किती तरी वर आला. गायी केव्हांच रानांत गेल्या. पांखरें केव्हांच हिंडू-फिरू लागलीं. पहाटेचीं दळणें केव्हांच थांबलीं. सडासंमार्जनें होऊन गेलीं. ऊठ, बाळ, उठतोस ना ?' विचारिलें सुश्रुतेनें गोड प्रेमळ वाणीनें.

« PreviousChapter ListNext »