Bookstruck

आस्तिक 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'तुझें सारें ब्रह्मज्ञान कोठें गेलें ?' त्यानें विचारिलें.

'ती पोपटपंची होती. तें ज्ञान चुलींत गेलें. या आगींतून जाऊन पुढें जें ज्ञान मिळेल, तेंच निश्चित ज्ञान.' ती म्हणाली.

सुश्रुता बाहेर गेली होती. वत्सलेनें केळीच्या गाभ्याला अंगाशीं धरलें होतें.  गार गार कालें. तें ती कपाळावर ठेवी, वक्ष:स्थलीं ठेवीं, गालांवर ठेवी, हातांवर ठेवी, आग, भयंकर आग.

तो पाहा कोण आला ? संकोचत आंत आला. आंत येऊन उभा राहिला. त्याचें अंग थरथरत होतें. तो एकदम धाडकन् पडला. वत्सला दचकली, चमकली. ती एकदम उठली. जवळ जाऊन बघते तों कोण ?

'आले, दारांत येऊन पडले. अरेरे ! आले नि पडले. दुर्दैवी मी ! मला भेटायला आले, लांबून आले, उपाशीतापाशी आहे, जीव मुठींत घेऊन आले. कोमल मनाचा माझा राजा. देवा, जागा हो रे. डोळे उघड रे--' ती त्याचें डोकें मांडीवर घेऊन विलपूं लागली. तिच्या डोळयांतील शतधारा त्याच्या मुखकमलावर गळत होत्या. ती हातांनी त्याचें केंस विंचरीत होती. त्याला थोपटीत होती. ती मुकी राहिली. ती डोळे मिटून होती. फक्त अश्रु घळघळत होतें. त्याचें मुखकमल फुललें. त्यानें वर पाहिलें, तिच्याकडे पाहिलें.

'वत्सले, रडूं नकोस.' तो म्हणाला.

'रडूं नको तर काय करूं ? तुम्हांला बरें वाटतें का ?' तिनें कातर स्वरांत विचारिलें.

'हो. जिवांत जीव आला. चैतन्य मिळालें. शक्ति आली. तूं रडूं नको.' तो म्हणाला.

'तुम्ही एकदां गोड हंसा म्हणजे मी रडणार नाहीं.' ती म्हणाली.

'मी हंसतों. परंतु माझें डोकें खाली ठेव. आपण जरा दूर बसूं.' तो म्हणाला.

'नागांना का दूर राहणेंच आवडतें ? रानांतील संकुचित बिळांत राहणें आवडतें ? आलांत ते दूर का बसायला ? आलांत ते दुरून का हंसायला ? दूर राहण्यांत शूरपणा नाहीं. तुम्ही कां भितां ? आर्यांना भितां ? तिनें विचारिलें.

'भीति मला माहीत नाहीं.' तो म्हणाला.

'मग ?' ती म्हणाली.

« PreviousChapter ListNext »