Bookstruck

आस्तिक 51

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'खरेंच हो. वत्सलेचा हात हलका आहे. माझ्या पायांत मागें केवढा कांटा गेला होता. परंतु मला कांही कळूं न देता तिनें काढला. काढूं दे तुमचा. झोप येईल. कांटा असेपर्यंत कुठली झोंप !' सुश्रुता नातीचें कौतुक करीत म्हणाली.

वत्सलेनें सुईसारखें शस्त्र आणलें.

'तुम्ही निजा. मी हळूच पाय धरून काढतें. हंसतां काय ?' ती खिजून म्हणाली.

'वत्सले, एवढासा कांटा, त्याचें केवढें माजवलें आहेस तूं स्तोम ! ' तो म्हणाला.

'लहान गोष्टी, परंतु त्या महान् होतात. वेळीच जपावें. आपण प्रथम थट्टेवर नेतों सारें. परंतु पुढें गंभीर होते परिस्थिति. प्राणाशीं पडतें गांठ. हं, निजा अस्से. द्या आतां पाय.' ती म्हणाली.

सुश्रुतेनें दिवा मोठा केला. वत्सलेनें डोळे मोठे केले. पाहूं लागली कांटा. तिनें पाय स्वच्छ केला धुऊन. नंतर ओंच्यांनीच तो पुसला. ढोपरावर ठैवून पाय कोरूं लागली. हळूहळू पाय उकरीत होती. मध्येंच कांटयाला सुई लागे. नागानंद हाय्से करी.

'लागली वाटतं सुई ? आतां नाहीं हो लागूं देणार.' ती म्हणे. शेवटी कांटा निघाला. तिनें तो पाय आपल्या हृदयाशीं धरला व डोळे मिटले. नंतर हळूच तो तिनें खालीं ठेवला. ती लाजली, हंसली.

'हा बघा काढलां कांटा. केवढां आहे !' ती म्हणाली.

'आतां सारें निष्कंटक झालें ना ? ' त्यानें विचारिलें.

'देवाला ठाऊक ! ' ती म्हणाली.

'आतां मी निजतों. बाहेर निजतों, घरांत मला झोंप येणार नाहीं. रानांत उघडयावर निजणारा नागानंद कोंडवाडयांत निजूं शकत नाहीं. ओटीवर झोंपतों.' तो म्हणाला.

वत्सलेनें अंथरुण करून दिलें.

'उशीं हवी का ?' तिनें विचारलें.

'कसली ?' त्यानें विचारिलें.

« PreviousChapter ListNext »