Bookstruck

आस्तिक 53

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"मी भित्री ? पाण्याचा लोंढा येत असतांहि नाचत उभी राहणारी का भित्री ? आजी, मला इतर कांहीं म्हण. परंतु भित्री म्हणूं नको.  भित्रेपणा त्यांना आवडत नाहीं हो ! भित्र्या वत्सलेकडे ते ढूंकूनहि पाहणार नाहीत. मी नाहीं भित्री.' ती म्हणाली.

"तो ओटीवर निजलें आहेत, वाघ आला तर काय होईल, अशी भीति नाहीं वाटली तुला ?' आजी हंसून म्हणाली.

"दुस-याच्या संरक्षणाची काळजी वाटणें म्हणजें कांही भ्याडपणा नाहीं. वाघ येता तर मीं तो मारला असता.' ती म्हणाली.

"जरा हळू ! ते जागे होतील. चल आंत. ' आजी म्हणाली.

वत्सला जाऊन झोंपली.

आस्तिकांच्या आश्रमांत आज गडबड होती. सर्व आश्रम शृंगारला होता. लतापल्लव व फुलें यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घातला होता. मोठें प्रसन्न व सुंदर वातावरण.

राजा परीक्षिति आज येणार होता. त्याच्याबरोबर इतरहि कांही ऋषिमंडळी येणार होती. त्याच्या स्वागताची सिध्दता होत होती. आज आश्रमाला सुट्टी होती. छात्रगण निरनिराळया कामांत मग्न होता. कांही छात्र पुढें गेले होते. येणारी मंडळी दिसतांच ते शिंग वाजवणार होते. अतिथिशाळेत सर्व व्यवस्था करण्यांत आली होती.

तें पाहा शिंग वाजलें. भगवान् आस्तिक पुष्पहार घेऊन सामोरे निघाले. बरोबर छात्रमंडळी होती. राजा परीक्षितीचा रथ दुरून ओळखूं येत होता. बरोबर कांही घोडेस्वार होते. दुस-या कांही रथांतून ऋषिमंडळी होती. भगवान् आस्तिक दिसतांच राजा रथांतून उतरला. तो एकदम पुढें आला व त्यानें प्रणाम इतर ऋषिमंडळींनींहि आस्तिकांस अभिवादन केलें. आस्तिकांनी परीक्षितिच्या गळयांत सुगंधी फुलांचा हार घातला. इतर ऋषींनाहि त्यांनी पुष्पहार अर्पण केले. छात्रांनी झाडांवरून पुष्पवृष्टि केली.

सारे आश्रमांत आले. रथ एका बाजूला सोडण्यांत आले. पाहुण्यांनी हस्तपादप्रक्षालन केलें. कुशल प्रश्न झाले. आस्तिक स्वत: सर्वांची चौकशी करीत होते. गोड फळांचा उपाहार देण्यांत आला.

"भगवन्, किती मधुर आहेत हीं फळें ! अशी मी कधीं चाखलीं नव्हती. राजाच्या उपवनांतूनहि अशी रसाळ फळें मिळणार नाहींत.  तुम्ही कोणती करतां जादू ?' परीक्षितीनें विचारलें.

« PreviousChapter ListNext »