Bookstruck

आस्तिक 58

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दिव्याचे आंत ज्योत नसेल तर बाहेरचा दिवा काय कामाचा ? तो कितीहि स्वच्छ ठेवला तरी काय उपयोग ? म्हणून शेवटीं गाभा-यांतील मानव्याच्या परिपूर्णतेची सुंदर ज्योत ज्याच्या जीवनांत पेटली तोच खरा.

भगवान् आस्तिकांच्या ठिकाणी मानव्य परिपूर्णतेस गेलेलें मला दिसतें. म्हणून त्यांचें सारें जीवन प्रकाशमान दिसतें. त्यांचे जीवन म्हणजे एक मंगल ज्योत आहे. म्हणून मी त्यांचेकडे येतों. जेव्हां जेव्हां अंधार मला घेरूं पाहत आहे असें मला वाटतें, तेव्हां तेव्हां मला येथें यावेंसे वाटतें. आजहि माझ्या मनांत अंधार शिरला आहे. मला कर्माकर्म समजेनासें झालें आहे. मी किंकर्तव्यमूढ झालों आहें.  भगवान् आस्तिकांनीं प्रकाश दाखवावा.'

आस्तिक म्हणाले,'राजा, तुझ्या मनांतील सर्व सांग. मला त्यावर जें कांही सांगतां येईल तें मी सांगेन. आपण एकमेकांस हात देऊन पुढें जावयाचें.'

परीक्षिति म्हणाला, 'भगवन्, आज दोन संस्कृतींचा संघर्ष उत्पन्न झाला आहे. आपण आर्य या प्रदेशांत आलों व या प्रदेशाला आर्यावर्त म्हणूं लागलों. परंतु येथें नाना प्रकारचे मूळचे लोक होतेच. त्यांच्या आपल्या लढाया झाल्या. ते पांगले. परंतु आपण वसाहती वाढवीत चाललों. आपले त्यांचे संबंध येऊ लागले. त्यांच्याशीं आपल्या लढायाहि होत होत्या व त्यांच्याशीं सोयरिकीहि होत होत्या. पुष्कळ नागकल्यांशी आपण लग्नें लाविलीं.  त्या नागकन्यांनीं आपल्या माहेरचीं दैवतें आपणांबरोबर आणिलीं. इतरहि आर्येंतर स्त्रियांनी आपापलीं दैवतें आर्यांच्या घरीं आणिली. सारी खिचडी होत आहे. निरनिराळया चालीरीती घुसत आहेत, नवीन पध्दति पडत आहेत, अशा वेळी काय करावे ? वेळींच जपलें पाहिजे. संस्कृति स्त्रियांच्या हातीं असते. आर्य संस्कृति निर्मळ राहायला हवी असेल तर नागांपासून दूर राहावयास नको का ? हे विवाह निषिध्द मानायला नकोत का ? आर्य व आर्येतर यांचे विवाह होऊं नयेत असे निर्बंध नकोत का घालायला ? लोकांना मोह होतो. नागकन्याहि अधिक सुंदर व गोड असतात. आर्यकुमार मोहांत पडतात. तेव्हां नागांना येथून जा म्हणून सांगणें हेंच नाहीं का योग्य ? आतां तर आर्यकन्या नागतरुणांजवळ विवाह करूं लागल्या आहेत. श्रेष्ठ आर्यांनी नीच नागांजवळ  लावावींत का लग्नें ? हा अध:पात नाहीं का ? आपल्याच मुलाबाळांचा अध:पात आपण का पाहावा ? नीच जातींपासून दूर राहणें बरें. असे अनेक प्रश्न मनाला त्रास देत आहेत. प्रजेमध्यें ह्या विचारांच्या चर्चा होत आहेत. राजांचे कर्तव्य काय ? माझें कर्तव्य काय ? मला सांगा. मला मार्ग दाखवा.'

सारी सभा तटस्थ होती. राजानें महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला होता. उत्तर ऐकावयास झाडांवर पक्षीहि शांतपणें बसून राहिले. आश्रमांतील हरणेंहि आस्तिकांची वाणी ऐकावयास कान टवकारून उभीं राहिलीं. घोडा दूर खिंकाळला व 'मीहि सावधान आहें' असें त्यानें कळविले.

« PreviousChapter ListNext »