Bookstruck

आस्तिक 63

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्यानें तेथें जणूं वनसृष्टि निर्मिली होती.  एक सुंदर विहीर त्यानें खणली. तिला पाणीहि भरपूर लागलें. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतांत साधी पण मनाहर अशीं झोंपडीं त्यानें बांधली होती. दिवसभर तो शेतांत श्रमें. जमीन फार सुपीक होती. तिच्यांत सोनें पिकलें असतें. नागानंदानें बांधाच्या कांळानें फुलझाडें लाविली होतीं. भाजीपाल्याचा मळा केला होता. बाजूला गाईचा गोठा होता. त्या गाईंची तो स्वत: काळजी घेई. फुलांच्या माळा करून गाईच्या गळयांत घाली.  गोपालकृष्णाच्या अनेक हृदयंगम कथा त्यानें ऐकल्या होत्या. तो गाई कशा चारी, पांवा कसा वाजवी, एकत्र काला कसा करी, सारें त्यानें ऐकलें होतें. तोहि सायंकाळ होत आली म्हणजे बांसरी वाजवी. गाई परत येत. एखादे वेळेस गाई लौकर नाहीं आल्या तर तो बांसरी वाजवीत हिंडें. कधीं कधीं एखाद्या झाडाखालीं बसून अशी गोड बांसरी वाजवी, कीं सारी सृष्टि मोहून जाई.

वत्सलेच्या घरापासून शेत जरा लांब होतें. नागानंद सकाळीं उठून फुलें व भाजीपाला वत्सलेच्या घरीं नेऊन देई. दूध नेऊन देई. परंतु एके दिवशीं उजाडलें नाहीं तोंच वत्सला शेतावर आली. आश्विन महिन्याचे दिवस होते. उंच गवत वाढलेलें होतें. दंव पडून तें आलेंचिंब झालेलें होतें. त्या ओल्या गवतांतून ती आली. नागानंद गाईचें दूध काढीत होता. वत्सला समोर उभी. गाय वासराला चाटीत होती.

'सारें नका दूध काढूं. वत्साला ठेवा.' ती म्हणाली.

'वत्सलेलाच वत्साची काळजी वाटणार.' तो म्हणाला.

'तुम्हांला नाहीं वाटत असें नाहीं कांही माझे म्हणणें.' ती म्हणाली.

'वत्सले, मी दोन सड वत्साला ठेवतों. दोहोंचेच दूध काढतो.' तो म्हणाला.

वत्सलेनें हिरवा हिरवा बांधावरचा चारा आणला व गाईच्या तोंडांत दिला. गाईनें आनंदानें घेतला. ती गाईच्या मानेखालून हात घाली. गाय मान वरवर करी.

'गुरांनासुध्दां प्रेमळ माणूस हवें.' नागानंद म्हणाला.

'परंतु माणसांना नको.' वत्सला म्हणाली.

« PreviousChapter ListNext »