Bookstruck

आस्तिक 66

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'चालूं दे नागपुराण, वेदनापुराण !' ती म्हणाली.

'वत्सले, खरोखरच नागपुराण गात राहावें असें मला वाटतें. अग, तो नाग वारा खाऊन राहतो व सर्वांपासून दूर असतो. चंदनाचा सुगंध, फुलांचा परिमल, गोड, मधुर असें संगीत, यांचा तो भोक्ता आहे. जें सुंदर व मंगल, जे सुगंधी व निर्मळ, त्याच्याशींच तो जाईल. तेथें आपली स्वाभिमानी फणा लववील. होतां होईतों नाग संतापत नाहीं. परंतु संतापलाच, तर एका दंशाने काम करतो. तें त्याचें विष म्हणजे त्याचें सामर्थ्य ! तें तो वारेमाप उधळीत नाहीं. अत्यंत आणीबाणीच्या वेळेशिवाय तो दंश करीत नाहीं. त्याच्याजवळ संयम आहे म्हणूनच निश्चित व अमोघ असें सामर्थ्यहि त्याच्याजवळ आहे.' नागानंद नागस्तुति करीत होता.

'दूध ना देतां ?' तिनें विचारिलें.

'हो, हा घ्या द्रोण. कसें आहें फेंसाळ दूध ?' तो म्हणाला.

ती दूध प्याली. तोहि प्याला. वत्सला त्याच्या झोंपडींत पाहूं लागली.  झोंपडींत फारसे सामान नव्हतें. दोन घोंगडया होत्या. गवताच्या विणलेल्या चटया होत्या. तेथें एक सुंदर बांसरी होती.

'तुम्हाला येते का वाजवायला ?' तिनें विचारलें.

'हो.' तो म्हणाला.

'कोणी शिकविलें ? तिनें विचारिलें.

'वा-यानें व नदीनें; झाडांच्या पानांनी, पांखरांच्या कलरवांनी.  सृष्टि माझा गुरु.' तो म्हणाला.

'मला एकवतां वेणुध्वनि ?' तिनें गोड शब्दांत विचारिलें.

'तुमचे बोलणें म्हणजेच वेणुध्वनि. किती गोड तुमचें बोलणें ओठांच्या मुरलीतून हृदयाचे संगीत बाहेर पडतें. हें खरे वेणुवादन ! तो म्हणाला.

'नागमोडी बोलणें मला नको. या सरळ बांसरीतून मधुर संगीत ऐकवा.' ती लाजत व रागावत म्हणाली.

« PreviousChapter ListNext »