Bookstruck

आस्तिक 83

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'राजा, सांगावयाचें तें सांगून झालें. माझें हृदय तुला दिलें. माझी बुध्दि तुला दिली. माझे अनुभव तुला दिलें. आतां अंधारांतून उषा येईल. तुझ्या जीवनांत ज्ञानप्रभा फांको. मालिन्य निरस्त होवों. तुझें कल्याण होवों. आज सात दिवस झाले. संगीतांत सात सुर असतात. इंद्रधनुष्यांत सात रंग असतात. तुला सारें सूर सांगितलें; सारे रंग दाखविलें. आतां जीवनांत संगीत निर्माण कर. सौंदर्य निर्माण कर. संगींत कसें निर्मावयाचें, सूर कसे जुळवावयाचे, सौंदर्यं कसे निर्मावयाचें, नाना रंगांची प्रमाणबध्द सजावट कशी करावयाची, तें सारें तुला सांगितलें.  नाना कथांनी, उदाहरणांनी, दृष्टांन्तांनीं सोपें करून दिलें आहे. तूंहि अनन्य भक्तीनें सारें ऐकलेंस. असा श्रोता मला मिळाला नाहीं. तूं मला धन्य केलेंस. आतां पारणें कर.  विश्रांती घे.' शुक्राचार्य म्हणाले.

'भगवन्, शब्दातीत माझी स्थिति आहे. जीवन उचंबळून आलें आहे. काय मी बोलूं ?' असें म्हणून त्यानें शुक्राचार्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलें. अश्रूंनी ते चरण धुतले गेलें.

दोघे शांतिमंदिरांतून खालीं आले. मंगल वाद्यें वाजलीं. शुक्राचार्यांच्या पायां पडण्यासाठीं लाखोंची गर्दी झाली. राजपुरुष व्यवस्था ठेवतां ठेवतां दमले. पुढें दोघांचीं स्नानें झालीं. दोघेहि साध्या आसनांवर बसलें.

'आपणहिं पारणें करणार ना ?' परीक्षितीनें विचारलें.

'मला थोडें पाणी दे म्हणजे पुरे.' शुक्राचार्य म्हणाले.

'एखादें फळ नको ?' त्यानें प्रेमानें विचारलें.

'राजा, तूं घे फळें. गंगाजळ व जगाचें कल्याणचिंतन हाच माझा मुख्य आहार असतों. मला थोंडें पाणी दे म्हणजे पुरे.' शुक्राचार्य म्हणाले.

एका स्वच्छ झारींतून पाणीं आणण्यांत आलें. त्या नागयुवकाने तें आणलें. परीक्षितीसाठीं चांदीच्या ताटांत द्राक्षाफळें त्यानें आणिलीं होतीं. निर्मळ रसार द्राक्षाफळें.

'राजा, मी पाणी पितों. तूं घे तीं गोड द्राक्षें.' शुक्राचार्य म्हणाले.

त्यांनी पाणी घेतलें. राजानें द्राक्षें तोंडात टांकलीं.  परंतु त्याला एकटयाला संकोच होत होता.

'राजा, संकोच नको करूं. घें ती द्राक्षें खा, त्यांनी अपाय नाही होणार.' शुक्राचार्य प्रसन्नपणें म्हणाले.

« PreviousChapter ListNext »