Bookstruck

आस्तिक 86

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'क्षमा.' परीक्षिति म्हणाला.

तो तरुण गेला. परीक्षिति शुक्राचार्यांच्या चरणीं मरून पडला. गंभीर प्रसंग.  तें मरण होतें कीं जीवन होतें ?

'जनमेजया, मी जातों. शोक करूं नका. ज्या मरणानें प्रेमाचा पाऊस पडला तें मरण अपूर्व आहे, तें मरण अमर आहे--' असें म्हणून शुक्राचार्य गेलें.

'वत्सले, तूं नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस.  परंतु शेवटीं नागाला सोडून आर्यालाच माळ घातलीस. ' कार्तिक म्हणाला.

'नागानंद नागजातीचेच आहेत.  ते स्वत:ला नागच म्हणवितात.  कोणीं सांगितलें तुला कीं ते आर्य आहेत म्हणून ?' वत्सलेनें विचारलें.

'सुश्रुता आजीच म्हणत होत्या.  एका आर्यापासूनच त्यांची उत्पत्ति आहे.  त्याची आई होती नाग, परंतु पिता होता आर्य. 'ज्या जातीचा पिता, त्या जातीचीं मुलें' असें आर्य मानतात.  आई कोणी का असेना ? म्हणून नागानंद आर्यंच आहेत.' तो पुन्हां म्हणाला.

'कार्तिक, नागानंदावर माझें प्रेम आहे. ते आर्य आहेत कीं नाग आहेत ह्याच्याशी मला कांहीएक करावयाचें नाहीं. ते माझे आहेत. माझ्यासाठीं जन्मलेले आहेत, असें मला वाटलें म्हणून मी त्यांची झालें. प्रेमाला जात नाहीं, गोत नाहीं. प्रेम परिपूर्ण करणारें असतें, अपूर्णाला पूर्णता देणारें असतें.  नागानंद स्वत:ला नाग समजतात. नागांची बाजू घेतात. एखादा नाग स्वार्थासाठीं कांही दुष्ट आर्यांच्या नादीं लागून जर नागांचाच द्वेष करूं लागला तर तो का नाग ? शेवटीं आपलीं जात कोणती, धर्म कोणता ? आपण कोणाचे ? ज्याच्यासाठीं आपण मरतों त्याचे आपण. नागानंद नागांसाठीं तडफडतात म्हणून ते नागांचे आहेत.  प्रतिज्ञेचा अर्थ पाहावयाचा असतों, अक्षरें नाहीं.' ती म्हणाली.

'तूं रागावलीस ? तूं रागावत तरी जा माझ्यावी.  मला प्रेम नसशील देत, तर क्रोध तरी दे कांही तरी तुझें दें. तूं माझीं अगदींच उपेक्षा नको करूं.' कार्तिक म्हणाला.

'कार्तिक, अलीकडे तूं सारखें सूत कांतीत कां बसतोस ?' तिनें विचारिलें.

« PreviousChapter ListNext »