Bookstruck

आस्तिक 89

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'आलीस लाल पातळांत, दिसतेस हिरव्या पातळांत.' तो म्हणाला.

'तुम्हांला हिरवें आवडतें म्हणून सारें हिरवेंच दिसतें. हे हिरवें नाही पातळ, हें लालच आहे. नीट बघा.' ती हंसून म्हणाली.

'कोणी दिलें हें ?' त्यानें विचारिलें.

'माहेरची भेट आली.' ती म्हणाली.

'कोठें तुझें माहेर ?' त्याने विचारिलें.

'सर्वत्र !' ती म्हणाली.

'वत्सले, तुला काय इच्छा आहे ? तुला काय पाहिजे, ते सारें सांग. तुझे डोहाळे पुरवले पाहिजेत. सांग.' तो प्रेमानें म्हणाला.

'काय सांगूं ? आर्य व नाग यांच्यांत प्रेम उत्पन्न करण्यासाठीं मरावें असें मला वाटतें. आपण केव्हां जायचे प्रचार करायला ? सर्वत्र प्रेमाची पताका नेऊं.' ती म्हणाली.

'आतां कोठें जावयाचें ? तुला आतां भराभर चालवतहि नाहीं. कशाला आलीस लांब ? आणि पाणी ना घालीत होतीस ? अति श्रम बरा नव्हें.' तो म्हणाला.

'थोडा फार श्रम करीत तरच सारें नीट होईल. बसेन तर फसेन. आज वारा नाहीं. अगदीं उकडतें आहे.' ती म्हणाली.

'वारा घालूं ?' त्यानें विचारिलें.

'आणा तोडून पल्लव व घाला मला वारा.' ती हंसून म्हणाली.

ती तेथें पाय लांब करून बसली होती. तो तिला वारा घालीत होता. सायंकाळ होत आली. पतीचा हात धरून वत्सला घरीं आली. ती थकून गेली होती. श्रांत झाली होती.

« PreviousChapter ListNext »