Bookstruck

आस्तिक 93

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'जगांतील दु:खी लोकांना हंसविण्यासाठीं, आनंदविण्यासाठी परमेश्वर अशीं प्रदर्शनें मांडतो. प्रात:काळची उषा पाहून कोणाला प्रसन्न वाटणार नाहीं ? सायंकाळचे हे रंग पाहून कोणाचें हृदय रंगणार नाहीं ?  रात्रीच्या तारा पाहून कोणाचा ताप दूर होणार नाहीं ?  हिरवीं झाडें पाहून कोणाचे डोळे निवणार नाहींत ? प्रसन्न नद्यां पाहून कोणाचें मन निर्मळ होणार नाही ?  आणि ती फुलें, नाना रंगाचीं व गंधांचीं, त्यांना पाहून तर सारी चिंता पळते, सारे दु:ख दुरावतें, चिमुकली फुलें, परंतु अनंत आनंद त्यांच्या पाकळीपाकळींत असतों. कशीं गोड हंसतात, वा-यावर डोलतात ! देवानें हे आनंद आपल्याभोंवती ओतून ठेवले आहेत. परंतु आपणास हे आनंद दिसत नाहींत ! 'नागानंद म्हणाला.

'तुम्ही किती सुंदर सांगता ?  खरेंच का तुम्ही आश्रमांत होतात ? तिनें विचारिलें.

'मागें नव्हतें का सांगितलें होतों म्हणून ?  महान् गुरु, थोर आचार्य ! ते मला म्हणत, 'नागानंद, ही सृष्टि हाच खरा गुरु. हिच्याजवळ शीक. ही सृष्टि सारें तुला शिकवील !' त्यांचे शब्द मी विसरणार नाहीं. हें हिरवें हिरवें गवत ! पाहा तरी याच्याकडे.  याच्या मुकेपणांत किती आहे अर्थ ! भूमातेचें हें काव्य आहे. भूमातेच्या पोटांतील हें वात्सल्य बाहेर पडलें आहे. भूमातेची सरलता, निर्मलता, सुंदरता जणूं बाहेर पडली आहे. का पर्जन्याचे प्रेमळ हात लागतांच तिच्या अंगावर हे हिरवे रोमांच उठले? मौज आहे.' तो म्हणाला.

'तुम्ही कवीसारखें बोलतां. तुम्ही वाल्मीकीप्रमाणें लिहा रामायण.' वत्सला म्हणाली.

'माझें जीवन हेंच माझें रामायण. आपलें जीवन हेंच सर्वोत्कृष्ट काव्य. मी हें शेत पिकवितों, मी बांसरी वाजवितों, हें माझे काव्य. मी फुलें फुलवितों, गाई चारतों, हें माझे काव्य.' तो म्हणाला.

'दुस-यासाठी नदींत उडी घेतां, वाघांशी झुंजतां, हें तुमचे काव्य.' ती म्हणाली.

तूं सुध्दां त्या रात्रीं केवढे थोर काव्य रचिलेंस ! प्रेमाची लाल पौर्णिमा फुलविलीस, शृंगार-वीर-करुण रसांचे महान् काव्य निर्मिलेस. नाहीं ? त्याने प्रेमानें तिचा हात धरीत म्हटलें.

'आपल्या शशांकालाहि आश्रमांत पाठवावें. तुम्हाला काय वाटतें?' तिनें विचारिलें.

'एवढयांत नको. आणखी एकदोन वर्षांनी पाठवूं.' तो म्हणाला.

« PreviousChapter ListNext »