Bookstruck

आस्तिक 95

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'तुला मीं येथें द्रोणांत दिलें होतें तें आठवतें ?' नागानंदानें वत्सलेला विचारिलें.

'आणि बांसरी वाजवून पागल केलेंत. ' ती म्हणाली.

'बाबा, मला शिकवा ना बांसरी वाजवायला ? ' बाळ म्हणाला.

'मी दुस-याजवळ नाहीं शिकलों, स्वत: शिकलों.' पिता म्हणाला.

'तुम्हीं मोठे आहांत. मी लहान आहें. आई अजून माझें बोट धरते, तुमचें नाहीं धरावें लागत. मोठयांना सारें येतें. शिकवाल ना ?' त्यानें विचारिलें.

'आश्रमांत शिकवतील तुला. तूं जाशील ना आश्रमांत ? ' मातेनें विचारिलें.

'तेथें बांसरी शिकवतील ? तेथें माझ्याबरोबर पुष्कळ मुलें येतील खेळायला ? 'तूं नाग आहेस, नीच जातीचा आहेस.' असें नाहीं ना कोणी म्हणणार ? आज मुलें माझ्याजवळ खेळत होतीं. तों ते एक लठ्ठ आले व म्हणाले, 'त्याला नका रे खेळायला घेऊं. तो नाग आहे. तो नीच आहे. आर्यांहुन हीन आहे.' आई, कां ग असे म्हणतात ! तूं कोण, बाबा कोण ? ' त्यानें विचारलें.

'आश्रमांत नाहीं हो असें चालणार, तेथें आर्यं असो, नाग असो; सारें एकत्र खेळतात, एकत्र शिकतात. तेथेंच तूं जा.' वत्सला म्हणाली.

'तूं सुध्दां येशील ? आजी, बाबासुध्दां येतील ? मला आजीजवळ निजायला आवडतें. मला एकटें नाहीं निजायला आवडत. आई मी एकटा कां ग  ?  मला लहानमोठा भाऊं नाहीं. बहीण नाहीं. कां ग मी एकटा ?  तूं एकटीच आहेस ?  बाबा एकटेच आहेत ? ' त्यानें विचारिलें.

'होय, राजा. मी एकटीच होतें. हेंहि एकटेच.' ती म्हणाली.

'म्हणून मी पण एकटा ?  तुमच्यासारखा मी ? ' तो म्हणाला.

'माझ्यासारखा कोठें आहेस ? मी आहें काळा, तूं आहेस गोरा.' नागानंद दूध आणून म्हणाला.

« PreviousChapter ListNext »