Bookstruck

आस्तिक 97

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नागीण आहे व तिचीं पिलें जवळ खेळत आहेत अशी होती ती मूर्ति.  तेथें त्या दिवशीं मोठी यात्रा भरूं लागली. मोठया वडाच्या झाडाखालीं होती ती मूर्ति. गांवोगांवचे लोक येत; नाग येत, आर्य येत.  दुकानवाले दुकानें घेऊन येत. फळांची दुकानें, फुलांची दुकानें; पेढयांची दुकाने, भांडयांची दुकानें; वस्त्रें विकणारें येत, शस्त्रें विकणारें येत, सुतार रथ घेऊन येत, लोहार येत विळे, कोयता, फाळ घेऊन. तेथें मल्ल कुस्त्या खेळत; मुलें टिप-या खेळत, गोफ विणीत; बायका फेर धरून नागाचीं गाणीं गात.  झोक्यावर झोंके घेत. मोठा आनंद असे.

नागमूर्तीवर फुलांच्या राशी पडत, पत्रीचें पर्वत पडत. इतकें दूध तेथें नागमूर्तीवर ओतलें जाई कीं, तेथें एक दुधाची नदीच होई !

अशा त्या यात्रेला आश्रमांतील मुलें गेली होतीं, मुलें मोठीं गेलीं होतीं. लहान मुलें नव्हती गेलीं. यात्रा बरीच लांब होती. आश्रमांतील लहान मुलांना कंटाळा येऊं नये म्हणून त्यांना बरोबर घेऊन आस्तिक नदीवर गेले.  नदीच्या पाण्यावर त्यांनी खेळ आरंभिला. भाकरीचा खेळ.

'माझा दगड बघा कसा उडया मारीत जाईल, बघा हां. ' शशांक म्हणाला.

'फेंक बरें !' आस्तिक म्हणाले.

'शशांकने चिपतळ दगड घेऊन फेंकला. त्यानें सात उडया मारल्या. आस्तिकांनी एक दगड घेऊन फेंकला, परंतु तो एकदम बुडाला.

'तुमचा तर बुडाला.' शशांक म्हणाला.

'थांब, फिरून मारतो हां.' असें म्हणून त्यांनी दुसरादगड फेंकला. तो कसा टण्टण् उडया मारीत गेला. शेवटी दिसलाहीं नाहीं.

'किती छान गेला तुमचा दगड !' शशांकचा मित्र रत्नकांत म्हणाला.

'वेग दिला नीट तर दगडहि पाण्यावरून उडया मारतो. माणसानें आपल्या जीवनाला नीट गति दिली, नीट वेग दिला तर तोहि बुडणार नाहीं.  चिखलांत पडणारनाहीं. आनंदाकडें जाईल.' आस्तिक म्हणाले.

'कांही माणसें वाईट असतात.' शशांक म्हणाला.

'तीं चांगलीं नाहीं का होणार ? ' रत्नकांतानें विचारिलें.

« PreviousChapter ListNext »