Bookstruck

आस्तिक 99

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'धारेचा प्रवाह, प्रवाहाची नदी, नदीचा सागर.' शशांक म्हणाला.

'या गंगेला किती मिळाल्या आहेत नद्या, आहे माहीत ? ' आस्तिकांनी विचारिलें.

'यमुना मिळाली आहे.'

'गंडकी, घोग्रा मिळाल्या आहेत.'

'शोण मिळाली आहे.'

'सर्व प्रवाहांतून गंगा अभिमानानें दूर राहती तर ? 'यमुना काळीच आहे; गंडकींत दगडच फार आहेत; घोग्रा फारच धों आवाज करते; शोण फारच बेफाम होऊन येते ' असें जर गंगा म्हणती व यांना जवळ न घेती तर काय झालें असतें ? ' त्यांनी विचारिलें.

'गंगा गुतवळासारखी राहिली असती व पटकन् आटून गेली असती.' शशांक म्हणाला.

'अभिमानानें अलग राहाल तर मराल, प्रेमानें सर्वसंग्राहक व्हाल तर जगाल, असा सृष्टीचा संदेश आहे.' आस्तिक म्हणाले.

'शंकराच्या जटाजुटांतून गंगा निघाली म्हणजे काय ? ' शशांकानें प्रश्न केला.

'विष्णूच्या पायांपासून निघाली असेंहि रामायणांत आहे.' रत्नकांत म्हणाला.
'विष्णु म्हणजेच सूर्यांचे रूप. विष्णु म्हणजेच सर्वत्र प्रवेश करणारा. सूर्याचा प्रकाश सर्वत्र जातो. प्रकाश मिळणार नाहीं तर वृक्षवनस्पति वाढणार नाहींत, फुलें-फळें होणार नाहींत, आपण माणसें जगणार नाहीं. उष्णतेशिवाय जगणें नाहीं. म्हणून विष्णु सर्वांचे पालन करणारा, रक्षण करणारा असें म्हणतात. सूर्य सर्वांचे जीवन चालवितों. सूर्य म्हणजेच विष्णु. सूर्याचे किरण म्हणजे विष्णूचे पाय. या किरणांनी पाण्याची वाफ होते. त्या वाफेचे ढग होतात. त्या ढगांतून पुन्हां पाणी आपणांस मिळतें. नद्यां भरतात. सूर्याचें किरण, सूर्याचे पाय जर वाफ करणार नाहींत तर मेघ बनणार नाहींत. मग नद्या कोठून होणार ? म्हणून ह्या विष्णुपादोद्भव आहेत. गंगाच काय, सर्वच नद्यां विष्णुपादोद्भव आहेत. परंतु विशेषत: गंगेला म्हणतों याचें एक कारण आहे. उन्हाळयांत हिमालयावरचें हिम वितळतें. आणि लहान होणा-या गंगेला अपार पाणी मिळतें. उन्हाळयांतहि तिला पूर येतात. विष्णूचे पाय तिला पोसतात. म्हणून ती विष्णुपादोद्भव. आणि शंकराचा जटाजूट म्हणजे मोठें काव्य आहे. या हिमालयाच्या कैलासावर शिवशंकर राहतो असें म्हणतात.  हा कोणता शंकर ? अरें, तें कैलासशिखर म्हणजेच शिव. भस्म फांसलेला, चंद्र मिरवणारा दुसरा कोणता शिव ? पय:फेनधवल, कर्पूरगौर अशीं विशेषणें या शिखरालाच देतां येतील. याला शिव, शंकर म्हणतों.  कारण हीं शिखरें मेघांना आडवतात. मग हे मेघ मागें मुरडतात व या भरतवर्षांत पाऊस पडतो. हीं हिमालयाचीं शिखरें नसतीं तर कोठला पाऊस, कोठलें अन्न, कोठलें जीवन ? म्हणून याला शिव, मृत्युंजय अशीं नांवे दिलीं. अशा या शंकराच्या डोक्यांतून गंगा निघाली. म्हणजे या शिखरापासून ती निघाली.

« PreviousChapter ListNext »