Bookstruck

आस्तिक 110

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'ते आतां घर सोडून वत्सलेच्या शेतावर राहतात. त्यांना वत्सलेशीं लग्न करायचें होतें. ते निराश झाले. फार हंसत नाहींत, बोलत नाहींत. 'पुढील जन्मीं मिळेल वत्सला' असे म्हणतात. मला त्यांची दया येते. कृष्णीची आई म्हणाली.

कार्तिकानें सुंदर सुंदर फुलें तोडून परडी भरली. वत्सलेची परडी, नागानंदाने विणलेली परडी. ती परडी भरून तो कृष्णीच्या घरीं गेला.

'कोण आहे घरांत ? ' त्यानें विचारिलें.

कृष्णी बाहेर आली. कार्तिकाकडे पाहत राहिली.

'आई कोठें आहे ? ' त्याने विचारिलें.

'गेली पाण्याला.' ती म्हणाली.

'तुला ना हवी होतीं फुलें ? ही घें.' तो म्हणाला.

'तुम्हांला त्रास झाला.' ती म्हणाली.

'देवाच्या पूजेला फुलें आणून देण्यांत त्रास नसतो.' तो म्हणाला.

'परंतु हा नागांचा देव !' ती म्हणाली.

'मला नाग नीच नाहीं वाटत. नागांची मनें थोर असतात. हृदयें प्रेमह असतात.' तो म्हणाला.

'तुम्हांला केव्हां आला अनुभव ? ' तिनें विचारिलें.

'नागानंद किती तरी गोष्टी सांगत.' तो म्हणाला.

'कोठें आहेत नागानंद ? ' तिनें विचारिलें.

'वत्सला व ते प्रेमधर्माचा प्रचार करण्यासाठीं गेले आहेत.' तो म्हणाला.

'तुम्हीं कां नाहीं जात ? ' तिनें प्रश्न केला.

'माझ्यामध्यें स्फूर्ति नाहीं.' तो म्हणाला.

« PreviousChapter ListNext »