Bookstruck

आस्तिक 119

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'हो; तूं कां मला रडत ठेवलेंस ?  बोल.' तो म्हणाला.

'माझी खरी भूक लागावी म्हणून. मी पूर्वी आलें असतें, तर तुम्हींच मला हांकलून दिलें असतें. मला ओळखलेहिं नसतेंत. मी अगदीं वेळेवर आलें. तुचें जीवन रिकामें असतांना आलें. स्वत:ला पूर येतो तेव्हांच आपण दुस-यांस देतों. माझ्या जीवनांतील प्रेमपूर जेव्हां दुथडी भरून वाहूं लागला, तेव्हा मी आलें. तुमच्या जीवनांत तो पसरेल, तुमचें जीवन हिरवेंहिरवें होईल, असें वाटलें तेव्हां आलें.' ती म्हणाली.

दोनचार दिवस झाले. कृष्णी व कार्तिक बाहेर बसलीं होतीं. इतक्यांत कृष्णींची आई तेथें आलीं. रात्रीच्या वेळैस ती माता कां बरें आली ? घाबरली होती ती. कावरीबावरी झाली होती.

'कृष्णे, नीघ बाई आमच्याबरोबर. तुम्हीहि चला हो. जनमेजयाचे हेर आले आहेत. उद्यां राजपुरुष येणार असें कळतें. सारे ना आज येथून जाणार. येथें राहणें धोक्याचें. बध्द करून नेतील. आगींत फेंकतील. चला, उठा, विचार करण्याची वेळ नाहीं. ऊठ, पोरी. उठा हो तुम्हीं.' ती म्हणाली.

'आई, मी कशी येऊं ? हे तरी कसे येणार ? वत्सला व नागानंद यांचा विश्वासघात कसा करावयाचा ?  तूं जा, जें व्हावयाचें असेल तें होईल.' कृष्णी म्हणाली.

'मी सुश्रुता आजींची अनुज्ञा आणतें.' ती म्हणाली.

'त्या जा म्हणतील. तो त्यांचा मोठेपणा.  परंतु आपण कसें विचारा-वयाचें ? ' कृष्णी म्हणाली.

'पोरी, हट्ट नको धरूं. चल, वेळ नाहीं. ' आई तिचा हात धरून म्हणाली.

'नको आई. माझा जीवनप्रवाह आतां अलग नाहीं. मी एकटी नाहीं.' कृष्णी म्हणाली.

'उद्यां राजाचे अधिकारी आले व त्यांनी दरडावून विचारिलें तर कार्तिक तुला 'जा' म्हणतील. तुला खुशाल त्यांच्या स्वाधीन हे करतील. यमदूतांच्या हातांत तूं पडशील. हे आर्य म्हणून वांचतील. यांचा पिता खटपट करील. आणि तुला कोण ? तुला का प्राण नकोसे झाले आहेत ?  आईचें ऐक. नीघ.' माता आग्रह करीत होती.

'आई, तूं याचा अपमान नको करूं. मला राजाधिका-यांच्या स्वाधीन करण्याइतके का हे भीरु आहेत ? इतके का हे पुरुषार्थहीन आहेत ?  तूं निश्चिंत अस. आम्ही मरूं तर दोघें मरूं. जगूं तर दोघें जगूं. आई, तूं जा.' कृष्णी म्हणाली.

'आई, तुम्ही काळजी नका करूं. हा पूर्वीचा मेष्पात्र कार्तिक आतां राहिला नाहीं. कार्तिक आतां सिंह बनला आहे. मी माझें नांव उज्ज्वल करीन. जिचा हात मीं घेतला तो सोडणार नाहीं मी.' कार्तिक म्हणाला.

« PreviousChapter ListNext »