Bookstruck

आस्तिक 140

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'नागांच्या ऋषींची तुझ्या पित्याने विटंबना केली. त्यानें साप मारून ऋषींच्या गळयांत अडकविले, म्हणून त्या नाग-तरुणानें त्यांची हत्या केली. परंतु समजूं या कीं, तो तरुण द्वेषी होता. आणि तूं रे ? त्या एका हत्येचा हजारों नागांना जाळून बदला घेणारा. तूं, तूं किती द्वेषी ? नागांची पूजा करून नागलोक द्वेषी नाहींत होत. ते तुमच्यापेक्षा अधिक उदार आहेत. नागांची पूजा नागांप्रमाणे क्रूर होण्यासाठीं ते नाहीं करीत. क्रूर अशा नागांतहि ते परब्रह्म पाहून त्यांची उपासना करतात. सूर्य तेजस्वी आहे, मंगल आहे. त्याच्या ठिकाणीं पूज्य भाव धरणें सुलभ आहे. परंतु वांकडया विषारी सापांच्या ठिकाणीहि मांगल्य पाहणें ही मोठी दृष्टि आहे. तुमच्या आर्यांच्या दृष्टीपेक्षां ही विशाल दृष्टि आहे. अशा सर्पांची पूजा करून नागलोक उदाचरित बनले आहेत. आमच्या गांवांत मी बुडत असतां एक नाग तरुणच धांवला. त्या तरुणाच्या चरणीं मी प्रेम नको वाहूं तर का आर्य दगडांच्या वाहू ! मी नागांविषयीं सहानुभूति दाखवीन असें म्हणून माझ्या गांवांतील आर्य कांही मला पाण्यांतून काढण्यासाठीं धांवलें नाहींत. हा का आर्य धर्म ? हा तर अकारण द्वेषधर्म आहे. राजा, आमच्या गांवी वाघांचा उपद्रव होत असतां या माझ्या नागानंदानींच तो उपद्रव दूर केला. यांनीच आपले प्राण संकटांत घातले. असे हे नाग आहेत. तुम्ही आर्यच क्रूर आहांत. तुमच्या पूर्वजांनी आपल्या भाऊबंदकीसाठी सर्व भरतखंडातील क्षत्रियांचा विनाकारण संहार केला. माझे आजोबा तुमच्या पूर्वजांच्या लढाईतच मरण पावले. तुम्हीं आर्यांनी तुमच्या क्षुद्र भांडणांसाठी लाखों स्त्रियांना रडविलें. आणि आतां आज तूंहि स्वत:च्या मनातील द्वेषासाठीं लाखों निरपराधीं नागांचे हनन व हवन करीत आहेस. तुमचा धर्म हेच कां सांगतो ? तुमचा धर्म का वधिक धर्म आहे ? तुमची संस्कृति अशी अनुदार व नृशंस असेल, तर कोणाला वाटेल तिजविषयीं अभिमान ? तुमचा धर्म वधिकाचा असेल तर कोण त्या धर्माला हृदयांशी धरील ? अशा संस्कृतीसमोर मान वांकविण्यापेक्षां मेलेलें काय वाईट ? अशा पापांत सहकारी होण्यापेक्षां अग्निकाष्ठें भक्षिलेली बरी. राजा, टाक, जाळून टाक, सत्याला, प्रेमाला तपश्चर्येला, सतीत्वाला, पावित्र्याला, निरपराधीपणाला जाळून टाक. आयांना मुलांसह जाळ. पतींना पत्नींसह जाळ. मित्रांना मित्रांसह जाळ. आर्य धर्मांची ही द्वेषध्वजा फडकव. सूर्याची उपासना करणारे तुम्ही आर्य ? सूर्याप्रमाणें सर्वांची जीवनें समृध्द करणें, ती प्रकाशमान करणें, ती आनंदमय करणें हा वास्तविक सूर्योपासकांचा धर्म ! तुम्ही विष्णूची पूजा करणारे. सर्वांच्या अंतर्यामीं असणा-या त्या तेजोमयाला पाहणारें. सर्वांच्या ठायीं प्रकाश पाहणें, पावित्र्य पाहणें, मांगल्य पाहणें म्हणजेच परब्रह्म-प्राप्ति ! राजा,  द्वेषानें नाही रे देवदर्शन. अशी खालीं कां मान घालतोस ? तुझ्या द्वेषाग्नीला शांत करण्यासाठीं आम्हीं भगिनी येथें उभ्या आहोंत. प्रथम आम्हां दोघांची आहुति दें. प्रेमपूर्ण जीवनांची आहुति ! '

'होमकुंड धडधडत होतीं. राजा का फेंकणार नागानंद व वत्सला यांना ?   जनमेजय का जाळणार त्या हजारों स्त्री-पुरुषांना ?  एकेक क्षण म्हणजें मरणाचा जात होता.

'राजा, यांना करूं अर्पण ? ' वक्रतुंडानें विचारिलें.
राजा बोलेना. खालीं मान घालून तो बसला होता.
'राजा, काय आहे आज्ञा ? ' वक्रतुंडानें पुन्हा विचारलें.
'आज या सर्वांना घेऊन जा. विचार करायची त्यांना संधि देऊ या. वत्सले, आणखी विचार कर. तुला अवधि देतों. किती अवधि तें आज सांगत नाहीं, जा या सर्वांना घेऊन.' जनमेजयानें आज्ञापिलें.

सर्वांना हायसें वाटलें. बलिदानार्थ काढलेल्या त्या सर्वांनी प्रभूला मनांत धन्यवाद दिलें.

« PreviousChapter ListNext »