Bookstruck

आस्तिक 144

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रेमळ मानवेतर पशुपक्ष्यांची ही सृष्टि ! मानवालाहि कृतज्ञतेचे, प्रेमस्नेहाचे धडे देणारी ही सृष्टि ! हिला प्रणाम असो. आम्हांला ही सृष्टि आशीर्वाद देवो. '

आस्तिकांनी क्षणभर डोळे मिटले. पुन्हां ते स्थिर-गंभीर झाले. निघालें. पाठोपाठ ऋषिमुनी निघाले. त्यांच्या पाठोपाठ सर्व तरुण निघाले. महान् मूर्त त्याग वाट चालूं लागला. भगवान् आस्तिक निघणार आहेत ही गोष्ट सर्वत्र गेलीच होती. हारीत, यज्ञमूर्ति, दधीचि यांनी प्रचार केला होता. ते वाटेंत मिळालें. त्यांच्याबरोबर आणखी प्राणयज्ञ करणारे आले होते. ती पाहा कार्तिकाची सेना आली. शांतिसेना, कार्तिकानें आस्तिकांना साष्टांग प्रणाम केला. त्यांनी त्याला हृदयाशी धरिलें.

"तुझ्याच पत्नीनें ना हातांत निखारे घेतले ? धन्य आहेस तूं. धन्य तुमचा जोडा.' आस्तिक त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाले.

संतांचा हात पाठीवरून फिरणें, किती समाधान असतें ! तें जणूं तो परमेश्वराचा मंगल स्पर्श असतो. त्या स्पर्शाने शरीरांतील अणुरेणु पवित्र होतो, पुलकित होतो.

पुढें स्त्रियांची शांतिसेना मिळाली. शांतीचे ध्वज हातीं घेऊन जाणा-या स्त्रिया. कडेवर मुलें घेऊन जाणा-या माता ! प्रेमधर्म जगाला मातांनी नाहीं शिकवावयाचा तर कोणीं ? त्या स्त्रिया एकीमागून एक आस्तिकांच्या पायां पडल्या. आस्तिकांच्या डोळयांतून पावित्र्य व मांगल्य स्रवत होतें. त्यांना तो अपूर्व देखावा पाहून उचंबळून येत होतें.

'ही कार्तिकाची माता, ही कार्तिकाची पत्नी.' एकानें ओळख करून दिली.

'अजून हातावरचे फोड बरे नाहीं वाटतें झाले ?  फुलाप्रमाणें कोमल अशा हातांत केवढी ही शक्ति !' आस्तिक म्हणाले.

त्रिवेणी संगम पुढें जाऊं लागला. हजारों लाखों स्त्रीपुरुष गांवागांवाहून ही अमर यात्रा पहावयास निघाले. सारा देश हादरला. सारें भारतखंड गहिवरलें. हिमालय वितळून वाहूं लागला. समुद्र उचंबळून नाचूं लागला. नद्या अधिकच द्रवल्या. त्यांचे पाणी पाणी झालें. अपूर्व असा तो क्षण होता !

« PreviousChapter ListNext »