Bookstruck

शिशिरकुमार घोष 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

घरंदाज व सुखवस्तु लोकांच्या मुलांबाळांसाठी ही सोय झाली. परंतु ज्यांना पोटासाठी दिवसाचे बारा तास काबाडकष्ट करावे लागतात. व मगच गोळाभर अन्नाची गोडी चाखावी लागते, त्यांनी या ज्ञानामृताची  चव कशी घ्यावी? होय त्यांचाही प्रश्न सोडविला पाहिजे. रात्रीच्या शाळा यांनी सुरु केल्या आणि मजूर, गोरगरिब यांना ज्ञानदानाची सोय करुन दिली.

मनाची अशा रीतींने जोपासना करण्याची काळजी घेत असतांना जनतेच्या आरोग्याकडे पण या बंधूनी लक्ष पुरविले. शरीर आजारी, दुर्बल व रोगग्रस्त असेल तर मन ज्ञानामृतासाठी तयार किती होईल? लोकांची  आजा-यांची शुश्रूषा व्हावी म्हणून सरकाराच्या मदतीने एक दवाखाना त्यांनी उघडला. लोकांचा पत्रव्यवहार करण्यास सोय व्हावी म्हणून पोस्ट ऑफिस या गावांत आणिलें आणि यामुळें आजुबाजुच्या ४-५ मैलांत  राहणा-या हजारो लोकांचे पत्रांसंबंधीचे हाल दूर केले.  असे रात्रंदिवस आपल्या ध्येयाच्या सिध्द्यर्थ या मंडळीचे अव्याहत प्रयत्न चालले होते. लोक त्यांस दुवा देत होते. अमृतबझार गांव  आतां जिल्हयातील प्रमुख गांव समजला जाऊ लागला. परंतु भावांची  महत्वाकांक्षा येवढयाने थोडीच शांत होणार? वसंतकुमाराच्या मनांत अलीकडे दुसरेच विचार खेळूं लागले. आपल्या गांवांत आपण समक्ष काय तें बोलतों चालतों. ते स्थानिक लोकांस समजतें. परंतु आपले विचार सर्व समाजांत पसरावयाचे असतील तर मुखपत्र पाहिजे. लोकहितवादीनी एके ठिकाणी म्हटले आहे की, 'वृतपत्रे म्हणजे मनुष्यांची लांब जिव्हा होय. 'या जिभेने आपणांस कित्येक कोस दूर असलेल्या जवळहि बोलतां येतें. सर्व लोकां जवळ आपणांस बोलता आलें पाहिजे. यासाठी आपला संदेशवाहक दूत तयार केला पाहिजे. हा दूत म्हणजे वृतपत्र. वसंतकुमारांच्या मनांत विचार आला. त्यांनी तो आपल्या भावांसमोर मांडला. शिशिरच्या मनास हा विचार फारच पटला. ताबडतोब तो यशस्वी करण्यास तो उठला. उद्योग सुरु झाला. अन्य गोष्ट सुचेनाशी झाली. कोणतीही गोष्ट मनास पटली म्हणजे तिच्या सिध्द्यर्थ आकाशपाताळ एक करणे हेंच वीरांचे काम आहें.

अनंत अडचणी 'आ' पसरुन उभ्या राहिल्या, पंरतु राक्षासणीच्या पसरलेल्या जबडयांतून धीरांने आंत शिरुन त्यांच पोट फाडणा-या मारुतीची हिम्मत शिशिरमध्ये होती. त्यानें अडचणींत उडी घेतली आणि त्यांस दूर नाहिंसे केलें. तो कलकत्यास आला. टाइप कसे जुळवावें हें शिकला. यंत्र-हस्तयंत्रे कशी चालवावी वगैरे सर्व शिकल्यानंतर तो घरीं आला. त्यानें एक लांकडी छापण्याचें यंत्र आणिलें होतें. जुन्या बंगाली लिपीचे सांचे त्यानें आणिले आणि या अल्प साधनसामुग्रीच्या जोरावर वसंत कुमारनें'अमृतप्रवाहिणी पत्रिका' असें ठेविण्यांत आलें. एका खेडेगांवात एक सुंदर विचारांचे वृतपत्र सुरु झाल्याचा बंगालमधील हा पाहिला सोन्याचा दिवस.

छापण्याची कला अद्याप सामान्य खेडयांतील लोकांस माहीत  नव्हती. शेजारच्या खेडयापाडयांतुन हजारों लोकांच्या झुंडी हें छापण्याचे यंत्र पाहण्यासाठी जमूं लागल्या. हें यंत्र पाहून ते आश्चर्यचकित होत व दि:डमूढ होऊन जात.

« PreviousChapter ListNext »