Bookstruck

श्री सिद्धेश्वर महादेव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


फार वर्षांपूर्वी अश्वशिरा नावाचा एक राजा होऊन गेला. तो अतिशय धार्मिक आणि आपल्या प्रजेचे उत्तम रीतीने पालन करणारा होता. राजयज्ञ अनुष्ठान करून राजाने सिद्धी प्राप्त केली होती. एकदा त्याच्या राज्यात कपिल मुनि आणि जैगीशव्य ऋषि यांचे आगमन झाले. राजाने त्यांचा यथोचित सन्मान केला आणि म्हणाला की मी ऐकले आहे की भगवान विष्णू सर्वश्रेष्ठ आहेत? त्यांचे दर्शन आणि त्यांच्या कृपेने मनुष्याला मोक्ष मिळतो? मग अशा भगवान विष्णूंना कोणी प्रणाम का करत नाही? दोन्ही ऋषींनी राजाला विचारले की असे तुला कोणी सांगितले? त्यांनी आपल्या सिद्धीने राजाला दरबारातच भगवान विष्णू आणि संपूर्ण सृष्टीचे दर्शन घडवले. राजा म्हणाला की तुमची सिद्धी पाहून मी आश्चर्य चकित झालो आहे. अशी सिद्धी कशी प्राप्त करायची? ते तुम्ही मला सांगा. राजाचे बोलणे ऐकून दोन्ही ऋषींनी त्याला सांगितले की तू अवंतिका नगरीत महाकाल वनात जाऊन सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन पूजन कर, तुला अलौकिक सिद्धी प्राप्त होतील. मुनींचे सांगणे ऐकून राजा त्वरित महाकाल वनात गेला. तिथे त्याला दोन्ही मुनी दिसले. राजाने भगवान विष्णूंना शिवलिंगाच्या मध्य भागावर बसलेले पहिले. त्यानंतर राजाने शिवलिंगाचे पूजन केले. सिद्धेश्वर महादेवाने प्रसन्न होऊन त्याला वरदान मागण्यास सांगितले. राजा म्हणाला की आपल्या दर्शनाची इच्छा होती ती तर पूर्ण झाली. अशा प्रकारे राजाने सिद्धी प्राप्त केल्या. विष्णुरूप शिवलिंगात विलीन होऊन गेले. असे मानले जाते की जो कोणी मनुष्य सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करतो त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात आणि अंती तो मोक्षपदाला जातो.

« PreviousChapter ListNext »