Bookstruck

साधू 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'हा घ्या फडका. याला पुसा पाय आणि आता इथं पडा. जरा विश्रांती घ्या. आता होईल स्वयंपाक. ताई व मी पटकन करू. आता घरच्यासारखं राहा. संकोच नको, बरं का?'

साधू आत गेला. ताईही उठली, चूल पेटली. ताजा ताजा स्वयंपाक तयार झाला. ताईने एक पत्रावळ मांडली; परंतु तिचा तो भाऊ म्हणाला, 'ताई, पत्रावळ नको. ते कपाटात चांदीचं ताट आहे ना, ते मांडू. त्या ताटाचा आज उपयोग करू आणि तो चांदीचा दिवा आहे ना, तो लावू. या पाहुण्यासमोर दिवा लावू. हसतेस काय ताई? या गरिबाला सर्वांनी हाकलून दिलं. आपण त्याचं सर्वोत्तम स्वागत करू. आपल्याकडे येऊन-जाऊन या दोन मोलाच्या वस्तू आहेत. चांदीचं ताट, माझ्या एका वाढदिवसी मागं मित्रानं दिलेलं आणि तो दिवा. तोही असाच एकानं दिला होता. आठवतं का तुला?'

'हो. 'तुम्ही सर्व हतपतितांना प्रेमाचा प्रकाश देता; सुष्ट दुष्ट म्हणत नाही, तुम्हाला काय देऊ? एक दिवा देतो;  तुमचं जीवन म्हणजे प्रेमाचा दीप,' असं म्हणून त्या एका गृहस्थानं तो दिवा दिला होता. मी कशी विसरेन? मग काढू तो दिवा? तो लावू?'
'हं, काढ व लाव. मी त्यांना बोलावतो.'

पाट मांडण्यात आला, चांदीचे ताट ठेवण्यात आले. तो चांदीचा दिवा लावण्यात आला. किती सुंदर प्रकाश पडला होता. जणू त्या साधूच्या अंतरात्म्याचा तो प्रकाश होता. तो निराधार पाहुणा आत आला. ते स्वागत पाहून त्याचे हृदय उचंबळून आले. तो जेवायला बसला.

'आता पोटभर जेवा.'

'महाराज, माझं एवढं स्वागत कशाला? मी कोण आहे हे जर कळलं तर तुम्ही माझा तिरस्कार कराल. मी एक पापी, दुष्ट -'

'काही बोलू नका. मला काही ऐकवू नका. तुम्ही चांगले आहात. उगीच स्वत:ला वाईट का समजता? मनुष्य परिस्थितीनं वाईट होतो. सामाजिक रचनेमुळं वाईट होतो. तुम्ही चांगले आहात. जेवा स्वस्थ मनानं. ताई, त्यांना वाढ ना!' साधू म्हणाला.

« PreviousChapter ListNext »