Bookstruck

साधू 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'भाकर खाऊन जा. विसरलास वाटतं?'
'कर लवकर.'

बहीणभावांचे असे बोलणे चालले होते, तो तिकडून काही पोलीस एका माणसाला मारीत मारीत आणीत होते. ते साधूकडे येत होते. साधू अंगणात उभा राहिला. ताईही तेथे उभी राहिली.

'का मारता? मनुष्याला पशूप्रमाणं वागवू नये!' साधू म्हणाला.

'साधूमहाराज, यानं तुमच्याकडच्या वस्तू चोरल्या आहेत. चांदीचं ताट व चांदीचा दिवा. त्यांच्यावर तुमचं नाव आहे. हा चोर आहे. मोठा बदमाष आहे. कालच तो सुटला. आम्ही त्याच्या पाळतीवरच होतो. गावात त्याला कुठं जागा मिळू दिली नाही. तुम्ही त्याला जागा दिलीत, परंतु जिथं जेवला तिथं *** फ़टके मारले पाहिजेत हरामखोराला!' मुख्य पोलिस म्हणाला.

'मी यांना ओळखतो. माझ्याकडे ते रात्री झोपले. मीच त्यांना ते ताट व तो दिवा देऊन टाकला. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी कुठं जावं? जवळ एक दिडकी नाही. मी त्यांना या दोन वस्तू देऊन म्हटलं, या वस्तू विका. जे पैसे मिळतील त्यांच्या आधारे काही उद्योग करा. भाजीपाला विका. चिवडा-शेव विका. काही प्रामाणिक उद्योग करा. त्यांनी या वस्तू चोरलेल्या नाहीत. उगीच संशयावरून त्यांना मारलंत. आधी तुम्ही मला विचारलं पाहिजे होतंत. सोडा त्यांना. एकदा कानफाटे नाव पडलं म्हणजे कायमचं पडतं. मनुष्य का नेहमीच वाईट असतो? आपल्या अशा दुष्ट वर्तनानं मात्र निराश होऊन तो खरोखरच वाईट बनेल. एवीतेवी चोर चोर नेहमी म्हणतात, तर करूच या चोरी; एवीतेवी दुष्ट दुष्ट म्हणतात, तर होऊच या दुष्ट, असं मनुष्य म्हणू लागतो. म्हणून दुसर्‍याविषयी नेहमी सत्संकल्प करावा. असो. जा तुम्ही. सोडा त्याच्या दंडाच्या दोर्‍या.' साधू म्हणाला.

'मग हा सांगत होता ते खरं एकूण?' पोलिस म्हणाले.


'काय सांगत होता?' साधूने विचारले.

« PreviousChapter ListNext »