Bookstruck

अभगिनी व तिची लहान मुलगी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ते तीन तरुण होते. तिघे एकमेकांचे मित्र होते, ख्यालीखुशाली करणारे होते. प्रत्येकाचे एकेक प्रेमपात्र होते. परंतु हळुहळू त्या तिघांना त्या प्रेमपात्रांचा वीट आला. आपल्या पाठीमागे असणार्‍या त्या तिघींचा त्याग करावयाचा असे त्यांनी ठरविले.

ते तिघे आपापल्या त्या दोन दिवसांच्या राण्या बरोबर घेऊन निघाले. ते एका सुंदर थंडगार हवेच्या ठिकाणी जाणार होते. त्यांच्या प्रियकरणींना आनंद झाला होता. आपल्यावर आपल्या प्रियकराचे किती प्रेम, असे प्रत्येकीला वाटत होते.

ते हवेचे ठिकाण फारच मनोहर होते. जिकडे तिकडे घनदाट छाया होती. जंगलातून मधूनमधून नागमोडी लाल रंगाचे रस्ते होते. कोठे उंच गगनभेदी शिखरे, तर कोठे पाताळास भिडू पाहाणार्‍या दर्‍या. नाना रंगांची व गंधांची फुले जिकडे तिकडे दिसत. पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज राईतून ऐकू येत.

ते तिघे तरुण व त्या तिघी तरुणी एका भव्य हॉटेलात उतरली. प्रत्येकाची स्वतंत्र खोली होती. सायंकाळी ती  सारी फिरायला गेली. काही वेळ सर्व जण बरोबर होती. पुढे वाटा फुटल्या. एकेक जोडपे एकेक दिशेला गेले.

त्या गर्द छायेत ते पाहा एक जोडपे बसले आहे. प्रेमाशिवाय जणू जगात काही नाही, असे त्यांच्या मुद्रेवरून दिसत आहे.

'मला कधी कधी शंका येते. विचारू का?' ती म्हणाली.

'कोणती शंका!' त्याने विचारल.

« PreviousChapter ListNext »