Bookstruck

अटक 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रात्र झाली. दवाखान्यात कसे जावयाचे? सर्वत्र पोलिस होते. वालजीच्या घराजवळ एक संन्यासिनी राहात असे. वालजीची तिच्यावर भक्ती होती. तो रोज तिच्याकडे जावयाचा व तिला वंदन करून तिचा आशीर्वाद घेऊन यावयाचा. तो लपतछपत तिच्याकडे गेला.
'माईजी, मला तुमच्याकडे थोडा वेळ लपू दे,' तो म्हणाला.

'त्या खाटेखाली राहा,' ती म्हणाली.

'कोणी चौकशीसाठी आले तर मी इथं नाही असं सांगा,' त्याने विनविले.

आता रात्र बरीच झाली. वालजीच्या घराला गराडा पडला. सर्वत्र पोलिस उभे होते. तो पोलिस अधिकारी वर गेला; परंतु वालजी नाही! कोठे गेला वालजी? त्याने का पुन्हा हातावर तुरी दिल्या? आज बारा वर्षे त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. आपण प्रथम वर कळविले, हा नगराध्यक्ष वालजी आहे. नंतर कोर्टात ती गोष्ट जाहीर झाली. आपल्या हुशारीबद्दल आपणास बढती मिळेल, असे त्या नव्या पोलिस अधिकार्‍यास वाटत होते; परंतु आता तर फजितीची वेळ आली.

शहरभर तपास सुरू झाला; परंतु वालजीचा पत्ता नाही.

'त्या संन्यासिनीकडे ते जातात. तिच्यावर त्यांची भक्ती आहे,' कोणी तरी माहिती दिली.


'बस. तिथंच असेल तो,' पोलिस अधिकारी आनंदाने म्हणाला.

पोलीस अधिकारी त्या संन्यासिनीच्या घरी आला. संन्यासिनी तेथे ध्यानस्थ बसली होती. दारावर टकटक आवाज झाला. संन्यासिनीने उठून दार उघडले.

'काय पाहिजे?' तिने प्रश्न केला.

'इथं नगराध्यक्ष आहेत का? ते तुमच्याकडे आहेत असं कळलं.'

'आहेत; नाहीत. नाहीत ते इथं.'


'प्रथम एकदम आहेत म्हटलंत?'


'ते चुकून आलं तोंडात.'


'मग नाहीत ना ते इथं?'


'नाहीत.'

« PreviousChapter ListNext »