Bookstruck

समुद्रात 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ते पाहा, एक मोठे गलबत बंदरात उभे आहे. ते गलबत कैद्यांनी भरलेले आहे. दु:खी कष्टी कैदी. त्यांच्या पायांत वजनदार साखळदंड अडकवलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूस हत्यारबंद पोलिस आहेत. तो पाहा आपला वालजी! त्या सर्व कैंद्यांत तो उठून दिसत आहे. त्याच्या तोंडावर एक प्रकारची दिव्यता आहे. धीरोदात्त वीराप्रमाणे  तो दिसत आहे.

गलबताच्या डोलकाठीवर एक खलाशी चढला होता. त्या डोलकाठीला लांब जाडया दोर्‍या बांधलेल्या होत्या. तो खलाशी त्या दोर्‍यांवर चढून त्या आवळीत होता की काय? परंतु हे काय झाले? तो दोरीला लटकत राहिला. आता ? कोण वाचवणार त्याला? हात सुटले तर समुद्रात पडेल तो, परंतु असा लोंबकळत तो किती वेळ राहणार? एकेक क्षण मोलाचा जात होता. सारे पाहात राहिले.

'त्या वालजीच्या पायांतील शृंखला काढा. त्याला मोकळं करा. तो या डोलकाठीवर चढेल. तो आपला पाय लांबवील. त्या पायाला खलाशानं आपले पाय अडकवावे. वालजी एका पायानं त्याचा सारा भार सहन करील. खलाशानं मग हात सोडावे इकडच्या डोलकाठीला धरावा,' असे कोणी तरी सांगितले. त्याप्रमाणे करण्यात आले. वालजी झपझप वर चढला. त्याने आपला मजबूत पाय लांबविला. त्या लोंबकळणार्‍या खलाशाने आपले पाय त्याच्या पायांत अडकवले व त्याने हात सोडले. त्याचा सारा झोल वालजीने सहन केला. वालजीचा पाय वाकला नाही. जणू  सिंगलबारच्या दांडीप्रमाणे त्याची ती तंगडी होती. खलाशाला वालजीने डोलकाठीकडे आणले. खलाशाने हाताने डोलकाठी पकडली व वरच्या पायांनी डोलकाठीला धरले. मल्लखांब सुरू झाला. तो सुर्रकन् खाली आला. सर्वांनी टाळया वाजविल्या. शाबास वालजी, असा जयजयकार झाला.

« PreviousChapter ListNext »