Bookstruck

लिलीची भेट 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'होय हो. घे. निजव ते मांडीवर किंवा अंथरुणात कुशीत घेऊन नीज. ते तुझं आहे. त्या मुलींच्या बाहुल्यांना नको हात लावू हो.' पाहुणा म्हणाला.

खाणावळवाला, त्याची बायको यांना मत्सर वाटला. त्यांच्या मुलीही तेथे आल्या. त्यांच्या बाहुल्या चिंध्यांच्या होत्या. लिलीजवळ ते सुंदर बाळ पाहून मालकाच्या मुली जळफळू लागल्या. 'ते पाहुणे गेले की, आम्हीच घेऊ ते बाळ, तुला चाबूक.' असे त्या पुटपुटल्या.

पाहुणे जेवले. त्यांची निजण्याची खास सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. आता घरातील काम आटोपले. लिली ते बाळ कुशीत घेऊन झोपली. खाणावळीत शांत झाले.

दुसरा दिवस उजाडला. पाहुणे आज जाणार की काय?

'लिल्ये, त्या पाहुण्यांना विचार जा, आज राहाणार की जाणार ते.' मालकिणीने सांगितले.

पाहुणे नेहमी येथे राहोत असे लिली मनात म्हणत होती. ती वर आली.

'काय बेटा?' पाहुण्याने प्रेमाने विचारले.

'तुम्ही इथं राहाणार का जाणार?' तिने विचारले.

'राहू का जाऊ?'

'राहा. नेहमी इथंच राहा.'

'इथं नेहमी कसा बरं राहू? लिल्ये, मी जाणार आहे. तू येतेस माझ्याबरोबर? माझ्या घरी राहा.'

'हं येते. कुठं आहे घर?'

'तिकडे लांब आहे.'

'परंतु हे मला सोडतील का?'

'त्यांना मी विचारतो.'

लिली खाली गेली. ते जाणार असे तिने सांगितले. मालक वरती गेला. त्याने पाहुण्यास नमस्कार केला. अदबीने तो त्यांच्याजवळ बसला.

'आपण जाणार म्हणता? राहात नाही?' त्याने विचारले.

'मला गेलं पाहिजे. आपले पैसे किती?'

'दीड रुपया.'


'दीड?'

« PreviousChapter ListNext »