Bookstruck

तो तरुण 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मुंबई शहरात एक सुंदर बंगला बांधून तो जहागिरदार राहात होता. तो आता म्हातारा झाला होता. तरी त्याची तरतरी कायम होती. जुने मजबूत हाडपेर होते. घोडयाच्या गाडीतून तो रोज फिरायला जायचा. अजून मुंबईत मोटारी फार झाल्या नव्हत्या. क्वचित एखादी कोठे नमुना म्हणून असली तर. घोडयांच्या ट्रामगाडया होत्या. श्रीमंत लोक बग्गी ठेवीत.

या जहागिरदाराला एक मुलगी होती. एक सरदाराशी त्याने तिचा विवाह केला होता; परंतु 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दात हा सरदार स्वातंत्र्याच्या बाजूने लढत होता. तो प्रयत्‍न अपयशी झाला. गुलामगिरी झाली. जहागिरदाराचा जावई नाना कारस्थाने करून वाचला. आयुष्य संपले नव्हते म्हणूनच तो वाचला.

सासरे-जावयाचे एके दिवशी कडाक्याचे भांडण झाले.

'तुम्ही हे क्रांतीचे मार्ग सोडा. आता ज्यांचं राज्य आहे त्यांची सेवा करा. माझं म्हातार्‍याचं ऐका.'

'तुम्हा जहागिरदारांचं ठीक आहे; परंतु गरिबांचं काय? उद्योगधंदे बसत चालले. बेकारी वाढत चालली. शेतकर्‍यांत तर हाहा:कार उडाला आहे. कुठं कुठं शेतकर्‍याचे उठाव होत आहेत. ते बंड करीत आहेत. त्यांची बाजू कुणी घ्यायची? मी गरिबांसाठी उभा राहीन!' जावई म्हणाला.

'तुमचं आमचं पटायचं नाही. तुम्हाला माझी मुलगी देऊन मी फसलो. तिला तुम्ही सुख लाभू देणार नाही. तुम्ही जाल तुरुंगात, अंदमानात. माझ्या मुलीनं काय करावं? तिच्या लहान मुलानं उद्या कुणाच्या तोंडाकडे पाहावं?'

« PreviousChapter ListNext »