Bookstruck

प्रेमाचा अंकुर 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पहाटेची वेळ झाली होती. बाहेर घोडयांच्या टापा आता ऐकू येत नव्हत्या. तपास थांबला असावा. लिलीला जवळ घेऊन वालजी तेथे बसला होता. इतक्यात कंदील घेऊन कोणी तरी येत होते. कोण राहत होते त्या भिंतीच्या आत?

तो एक म्हातारा मनुष्य होता. त्याने भिंतीजवळ कसले तरी वेल लावले होते. पहाटेच्या वेळेला त्या वेलांवर कीड पडते अशी समजूत होती. म्हणून रोज त्या वेळेला तो म्हातारा येई व वेलांच्या पानांवरून हात फिरवी. ते वेल तो हळूच झटकी. आजही त्याप्रमाणे तो आला. लिली घाबरली. वालजीला संकट वाटले.

त्या म्हातार्‍याला कोणी तरी दिसले. तोही घाबरला, परंतु धैर्य धरून त्याने विचारले, 'कोण आहे?'

'आम्ही दोन अनाथ माणसं आहोत. आधार द्या.' वालजी म्हणाला. कोणाचा हा आवाज? त्या म्हातार्‍याला तो आवाज ओळखीचा वाटला. तो आठवू लागला. तो कंदील घेऊन पुढे झाला व त्याने नीट न्याहाळून पाहिले.

'कोण तुम्ही? तुम्ही तर माझे अन्नदाते. तुम्ही नगराध्यक्ष. तुमचा कारखाना होता. तुम्ही दवाखाना घातलात. तुम्ही मला या मठात नोकरी दिलीत. या मठाला तुम्ही देणगी दिली होतीत. या महाराज, उठा, तुमच्या पाया पडतो. तुम्ही लाखोंना आधार दिलात. हजारोंचे तुम्ही अन्नदाते. तुमच्यावर अशी पाळी का यावी? उठा. थंडी आहे. माझ्या खोलीत चला. मी एकटा आहे. पलीकडे संन्यासी राहातात. संन्यासिनींचाही एक मठ आहे या बाजूला; परंतु मी एकटा आहे. चला माझ्या खोलीत. कढत कढत दूध प्या. झोपा पांघरून घेऊन. उठा देवा!' तो म्हातारा कृतज्ञतेने म्हणाला.

« PreviousChapter ListNext »