Bookstruck

प्रेमाचा अंकुर 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'कोण दिलीप?'

'होते एक विद्यार्थी.'

'ते सारं विसरून जा. इथं रामनामाचा जप कर. ब्रह्माचं चिंतन कर.'

'जे आवडते ते ब्रह्मच.'

'जे सर्वव्यापी ते ब्रह्म.'

'जे आपल्याला आवडतं तेच सर्वत्र आहे असं भासतं, नाही?'

लिलीचे व संन्यासिनींचे असे संवाद चालायचे. त्या एखादे वेळेस लिलीवर रागावत; परंतु लिलीवर त्यांचेही प्रेम बसले. लिली म्हणजे त्या मठातील मैना होती!

वालजी तिकडे एका खोलीत राहात होता. एके दिवशी तो मनात विचार करीत होता. लिली आता मोठी झाली असेल. तिला मठातून आणले पाहिजे. लिलीला अशीच किती दिवस ठेवू? तिचे आता लग्न झाले पाहिजे. तिचा संसार एकदा थाटून दिला म्हणजे मी मोकळा झालो. तिच्या आईला दिलेल्या वचनातून मुक्त झाल्यावर वालजीचे काम संपले, असे विचार त्याच्या मनात येत होते.

लिली परत आली. तिच्यात आता चांगलाच फरक झाला होता. ती सुंदर तरुणी दिसत होती. ती पुष्कळ शिकली होती. ती आता घरी नाना पुस्तके वाचीत बसे. एके दिवशी लिली वालजीबरोबर फिरायला गेली. सार्वजनिक  बागेत फिरायला गेली. ती एका बाकावर बसली. वालजी हिंडत होता. लिली एकटीच होती. इतक्यात एक तरुण येऊन त्याच बाकावर बसला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले.

'दिलीप!'

'लिली!'   

'किती दिवसांनी तुम्ही दिसलेत.'

'तुझं काय झालं मला कळेना.'

'तुम्ही रोज इथं फिरायला येता?'

'रोज येत नाही; परंतु आता येत जाईन.'

'का बरं?'

'म्हणजे इथं तू भेटशील.'

« PreviousChapter ListNext »