Bookstruck

क्रांतीची ज्वाला भडकली 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'अरे, ही तर छबी! ती पुरुषाचा पोषाख घालून आली होती. प्रियकराच्या रक्षणासाठी आली होती. त्याच्यासाठी प्राणार्पण करायला आली होती. रक्तबंबाळ होऊन ती पडली होती. दिलीप तिच्याजवळ बसला.'

'तू माझ्यासाठी गोळी घेतलीस?'

'या उदरात प्रेम आहे. या गोळीच्या वेदना नाहीत. मी तर आता मरणार; परंतु एका गोष्टीची क्षमा करा.'

'तू माझ्यासाठी प्राण दिलेस. मी काय क्षमा करू?'

'तुम्ही लिलीसाठी चिठठी दिलीत, ती मी नेऊन दिली नाही. मत्सर मनात आला. क्षम्य नाही का तो? एखादे वेळेसही लिलीचा मला हेवा नये का वाटू? तुमचं प्रेम तिला मिळावे व मला एक कणही नये का मिळू? परंतु ती चूक झाली. मी फसवलं तुम्हाला, ही पाहा ती चिठठी. ही घ्या. क्षमा करा. म्हणा क्षमा म्हणून. जरा माझं डोकं तुमच्या मांडीवर घ्या. एक क्षणभर.'
त्याने तिचे डोके मांडीवर घेतले. तिने त्याचा हात हातात घेऊन प्राण सोडले. दिलीप उठला. लिलीला त्याचा शेवटचा निरोप शेवटी नाहीच मिळाला. कोण नेईल निरोप? एक तरुण तयार झाला. तो म्हणाला, 'मी जातो.'

तो तरुण कसा तरी गेला. मोठया शर्थीने लिलीच्या पत्त्यावर गेला. ती चिठ्ठी त्याच्या हातात होती. तो त्या घरात जाणार, इतक्यात वालजी तेथे भेटला.

'कोण पाहिजे?' वालजीने विचारले.

'ही चिठठी द्यायची आहे.' तो तरुण म्हणाला.


'मी देतो.'

'नक्की द्याल?'

'हो.'

'मी जातो तर. तिकडे लढाई सुरू आहे.'

तो तरुण निघून गेला. वालजीने ती चिठ्ठी वाचली. लिलीच्या प्रियकराची शेवटची चिठठी. लिलीच्या प्रियकराचे प्राण वाचवण्यासाठी त्याला जाणे प्राप्त होते. दिलीप जर मेला तर लिलीचा आनंद नष्ट होईल. लिलीसाठी दिलीपला  जगणे जरूर होते. वालजीने चिठठी तशीच स्वत:जवळ ठेवली. तो निघाला. तोही त्या क्रांतिकारकांच्या वाडयात आला. त्यांच्यात तो मिळून गेला. ती तोफ कोणाला नीट डागता येत नाही. वालजीने ती सुरू केली. क्रांतिकारकांकडचा तोफेचा गोळा! धुडूम धुडूम. इतक्यात वालजीच्या दृष्टीस कोण पडले? दोघे एकमेकांकडे पाहात राहिले.

« PreviousChapter ListNext »