Bookstruck

लिलीचे लग्न 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'मी प्रेम वगैरे ओळखत नाही.'

'मग काय ओळखता?'

'पैसा!'

'किती पाहिजेत पैसे?'

'तुम्हाला सांगण्यात काय अर्थ?'

'परंतु कळू दे तर खरा आकडा!'

'मी माझी सारी इस्टेट दिलीपला देणार आहे. माझ्या इस्टेटीची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत जो हुंडा म्हणून देईल त्याची मुलगी मी करीन. मी दिलीपला देईन तेवढीच भर मुलीच्या पालकानंही घातली पाहिजे. मी असा मनाशी संकल्प केला आहे आणि माझा स्वभाव असा आहे की, जे एकदा मनात धरलं ते कधी सोडायचं नाही!'
'तुमच्या इस्टेटीची किती किंमत होईल?'

'होईल एक लाख रुपये.'

'एक लाख रुपये दिले तर लिलीला सून म्हणून पत्कराल ना?'


'हो, पत्करीन.'

'आता आणून देतो पैसे!' असे म्हणून वालजी घरी गेला. त्याने एक जुना अंगरखा काढला. त्यात जिकडे तिकडे नोटाच आत शिवलेल्या होत्या. वालजीने एक लाख रुपयांच्या नोटांची पुडकी बांधली. तो ती पुडकी घेऊन आला. 'घ्या मोजून!' तो म्हणाला.
'कुठून आणलेत हे पैसे?'

'लिलीचा बाप कारखानदार होता. त्यानं ठेवले होते पैसे.'


म्हातार्‍याचा आनंद गगनात मावेना. खरेच एक लाख रुपयांच्या नोटा! इतक्यात लिली व दिलीप तेथे आली. दिलीप आपल्या आजोबांजवळ बसला. लिली वालजीजवळ बसली.

'लिलीचा हात मी पुढं करतो,' वालजी म्हणाला.

'मी दिलीपचा करतो,' आजोबा म्हणाले.

'काय करता हे?' दिलीप व लिली म्हणाली.

'तुमचं लग्न लावीत आहोत,' दोघे म्हातारे म्हणाले.

« PreviousChapter ListNext »