Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बुद्धांजवळ नाना मीमांसा नाहीत, निरनिराळ्या उपपत्ती नाहीत. अनंत काळापासून माझ्याजवळ असलेले ते स्वयंभू, स्वयंप्रकाशी ज्ञान ते घेऊन या भूतलावर मी आलो आहे, असा दावा ते कधीही करीत नाहीत. जातकात ज्या गोष्टी आहेत, त्यावरुन बुद्धांनी अनेक जन्म घेऊन अति कष्टाने व प्रयत्नाने ज्ञान मिळवले होते असे दिसते. आध्यात्मिक उन्नती कशी करुन घ्यावी याची एक योजना ते आपल्या अनुयायांना देतात. एखादी मतप्रणाली न देता ते मार्ग दाखवितात. त्यांचा एखादा संप्रदाय नाही, एखादा नवीन धर्मपंथ नाही. एखादे तत्त्वज्ञान स्वीकारणे, एखादा संप्रदाय अंगीकारणे म्हणजे सत्याचशोधनास रजा देणे असे त्यांना वाटे. सर्व संशोधन झालेच आहे, मी या पंथाचा आहे, असे म्हटले की मग सारे अटोपले! कधी कधी सत्य गोष्टीकडेही आपण डोळेझाक करतो; त्याचा स्वीकार करायला तयार नसतो. त्यांच्याविरुद्ध आपल्याजवळ पुरावा असतो म्हणून नव्हे, तर ती विशिष्ट उत्पत्ती आपल्याविरुद्ध असते म्हणून. बुद्धां स्वत: ज्ञान मिळवले. त्यांना स्वत:  आलेला जो शब्दातीत अनुभव, त्यापासून त्यांच्या शिकवणीचा आरंभ आहे. बुद्धांचे कोणतेही तत्त्वज्ञान असो. त्यांची कोणतीही मतप्रणाली असो, त्या सर्वांचा संबंध तो अनुभव मिळविण्यासाठी आहे. त्यांचे जे काही तत्त्वज्ञान आहे, ते त्या अनुभवाप्रत पोचण्याच्या मार्गासंबंधी आहे निरनिराळ्या उत्पत्ती, नाना मीमांसा यांविषयी बोलताना बुद्धांनी एकदा एक मार्मिक उपमा दिली होती,

‘अंड्यात असणा-या पिलाने बाहेरच्या जगाविषयी केलेल्या कल्पना जितक्या मौल्यवान असू शकतील, तितक्याच मौल्यवान या नानाविध उत्पत्ती व मीमांसा असतात.’ सत्य समजून घेण्यासाठी सत्याकडे जाणा-या मार्गाने आपण चालत गेले पाहिजे.

बुद्धाची ही जी दृष्टी, तीच जगातील काही थोर अशा विचारवंतांचीही होती. तरुणांना बिघडवितो असा सॉक्रेटिसवर आरोप होता. त्या आरोपाला उत्तर देताना सॉक्रेटिस म्हणाला, “माझे विशिष्ट असे तत्त्वज्ञान नाही. अमुक एक ठरीव साचाचे सत्य माझ्याजवळ नाही. माझ्या एखाद्या विशिष्ट तत्त्वज्ञानामुळे मेलेटसच्या शिष्यांचे किंवा त्याच्या इतर आप्तेष्टांचे नुकसान झाले आहे, असा पुरावा त्याने मांडला नाही.” ख्रिस्तासही ठरीव साचाची ठोकळेवजा मते मुळीच आवडत नसत. त्याने एखादा नवीन धर्म शिकविला, एखादा नवीन पंथ स्थापला असे नाही. जीवनाचा एक नवीन मार्ग दाखविणे एवढाच त्याचा हेतू, ख्रिस्ताचा क्रॉस एखाद्या संप्रदायाची, आग्रही पंथाची निशाणी नसून एका नवपंथाची निशाणी होती. क्रॉस धारण करणे म्हणजे शिष्यत्वाची दशा.

« PreviousChapter ListNext »