Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || तीन || 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

उपनिषदांप्रमाणे एक विश्वात्मा माना. किंवा सांख्य दर्शनापॅमाणे अनेक पुरुषवाद माना. दोघांचेही आत्म्यासंबंधीचे, पुरुषासंबंधीचे अंतिम वर्णन एकच आहे. हा आत्मा, हा पुरुष शाश्वत आहे; अज व्यय आहे. परंतु आपण नीतीला जेव्हा प्राधान्य देतो, तेव्हा काहीतरी सुधारावयाचे आहे असे गृहीत असते. मनुष्य मुळात दैवी नाही. त्याला दैवी व्हायचे आहे. सद्विचार, सत्कर्मे, सद्वाणी यांच्या सतत अभ्यासाने, प्रयत्नपूर्वक रीतीने ही दैवी स्थिती उभारावयाची असते. मनुष्य हा एक प्रत्यक्ष, दृश्य असा धडपडणारा प्राणी आहे. जेथे सर्व संशय फिटतात, सारे बंध तुटतात, अशा त्या अंतिन्द्रिय शाश्वत ज्ञानावस्थेच्या कथा या धडपडणा-या मानवी प्राण्यास सांगण्यात काय अर्थ? ही वर्णने ऐकून त्याला कितीसे समाधान लाभणार? या प्रत्यक्ष चालत्या-बोलत्या सांसारिक मनुष्याला नीती मिळवायची आहे, त्या अंतिन्द्रिय आत्म्याला नाही मिळवायची. हे सारे दृश्य जगत् अनात्म आहे, जगातील वस्तूंत वा व्यक्तींत ते शाश्वत सत्य नाही असे सांगणे म्हणजे केवळ वैचारिक उत्पत्ती नाही; किंवा जगाच्या भंगुरत्वासंबंधीचा हा एक भावनापूर्ण उद्गार असेही नाही, तर सर्व नीतीचा पाया या म्हणण्यात आहे. प्रयत्न व निश्चय यांच्या जोरावर आत्मा उभारावयाचा आहे, निर्मावयाचा आहे. अनात्म पसा-यातून नीतीधर्माच्या पालनाने आत्मा निर्माण करा. आत्मा ही अशी वस्तू आहे, की जी उत्क्रान्त होत असते, वाढत असते, विकसित होत असते. कष्टपूर्वक प्रयत्नांनी प्राप्त करुन घेण्यासारखी ही गोष्ट आहे. आपोआप अनुभवायला मिळणारी ही वस्तू नाही. आपला हा जीवात्मा म्हणजे आपणास दग्ध करणा-या भावनांचा, ज्यांचा आपण ध्यास घेतो त्या वासना-विकारांचा, आपली पिच्छा न सोडणा-या अनेक इच्छांचा, जे अनेक निर्णय आपण घेतो त्या निर्णयांचा एक गोळा आहे. या सर्व गोष्टींमुळेच आपल्या जीवनाली एक प्रकारचा रंग चढला आहे. यामुळेच जीवनाचे हे नाटक चालले आहे. या वासना-विकारांत, या इच्छांत, या भावनांत, शाश्वत असे काही नाही. म्हणून तर आपण आज जसे आहोत त्याहून निराळे होणे शक्य आहे. व्यक्तीची सत्यता त्याच्या सर्जनात्मक संकल्पशक्तीत आहे. भावनांचा कोलाहल जेव्हा आपण शांत करतो, वस्तुजाताचा प्रवाह थांबवितो, शारीरिक वासना व भुका यांना गप्प करतो, त्या वेळेस आपणास आपल्यामधील आत्मसामर्थ्याचा साक्षात्कार होतो; एक प्रकारच्या आपल्या आत्मशक्तीची प्रतीती येते. आत्मा पथभ्रष्ट झाला, तर स्वार्थी बनून दुस-यांचे नुकसान करायला प्रवृत्त होतो. जगातील दु:खाचे मूळ वासना-विकारांनी भरलेल्या अहंभावात आहे.

« PreviousChapter ListNext »