Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || तीन || 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

धर्माच्या आजच्या स्थितीपेक्षा धर्माची जी आदर्श स्थिती, ते धर्माचे ध्येय आहे. सर्व ध्येयात्मक हेतूंचे परमैक्य म्हणजे धर्म. सर्व ध्येयांची बेरीज म्हणजे धर्म. हे ऐक्य आपणास कर्मप्रवृत्त करीत असते. आपणात इच्छा निर्मित असते. धर्माची आपणावर सत्ता असते, कारण धर्मात अशी एक स्वयंभू शक्ती आहे. आपणाहून भिन्न, आपणाहून पृथक् अशा व्यक्तींच्या जीवनात साक्षात्कृत असा धर्म दिसतो म्हणून नव्हे. धर्माला सत्यता आहे, कारण आपल्या कर्मावर त्याची सत्ता आहे. धर्म ही नि:संशय कर्मप्रेरक शक्ती आहे. आणि यासाठी धर्माला महत्त्व व सत्यता आहे. धर्माला अस्तित्वच नाही असे बुद्ध कधीच म्हणत नाहीत. धर्माला स्वतंत्र अस्तित्वही असेल; परंतु सृष्टीच्या पलीकडे असणा-या एखाद्या पुरुषोत्तमाशी धर्म जोडणे त्यांना पसंत नाही. धर्म किंवा नीतीचे ध्येय निसर्गाच्या पलीकडे आहे. ह्या गोष्टी मनुष्याच्या स्वभावाच्या बाहेरच्या आहेत असे मानणे, म्हणजे नैसर्गिक साधने नि:सत्व व भ्रष्ट आहेत असे मानणे होय. धर्म ही अशी बाह्य वस्तू मानणे, म्हणजे मनुष्य स्वभावत:च दुष्ट व पापी आहे व त्याचा उद्धार म्हणजे ईश्वरी कृपा होय, असे मानण्यासारखे आहे. मानवी स्वभावातील सुधारणा मानवी प्रयत्नांनी घडून याली आहे. मानवी प्रयत्नांचा हा नैसर्गिक परिणाम आहे, असे मग म्हणता येणार नाही. अतिमानवी शक्तीमुळे हे एकदम फरक झाले, एकदम क्रांती झाली, असे मग मानावे लागेल. धर्माकडे मनुष्याचा ओढा असतो याचा अर्थ बुद्ध असा करतात, की धर्म मानवी कर्मातून प्रकट होत असतो. न्यायी असावे, दयाळू असावे असे आपणांस वाटते व आपण तसे वागू लागतो. या नैसर्गिक सत्कर्माची ओढ प्रत्यक्ष कर्माद्वारे जसजशी अधिकाधिक प्रकट होत जाईल, तसतसे जग अधिक सुंदर व मंगल होईल. जगातील अव्यवस्था, निर्दयता, जुलूम कमी होतील. धर्म हे जीवनातील प्राणमय तत्त्व आहे. कर्ममय धर्म जगाला उभारीत असतो. बुद्धांच्या धर्मात, त्यांच्या शिकवणीत, वैयक्तिक निष्ठेला वाव नाही, प्रेमाची खोल, गंभीर पराकाष्ठा नाही; प्रेमाचे वेड नाही; सांसारिक प्रेमाप्रमाणे दिसणारे जिवाशिवाचे हितगुज नाही; आत्म्या- आत्म्यातील जिव्हाळ्याचे संवाद नाहीत; तर मग बुद्धांचा धर्म म्हणजे काय? या दृश्य पसा-यापलीकडे व्यापून राहिलेली जी सत्यता, तिचे दर्शन म्हणजे धर्माचा गाभा, धर्माचे रहस्य; स्वत:हून मोठे, स्वत:पलीकडे काहीतरी आहे असे आतून वाटणे व त्याच्याशी सत्यरुप असणे हा धर्माचा प्राण, हे धर्माचे सत्य स्वरुप बुद्धांमध्ये हा धर्माचा प्राण आहे. त्यांच्यात ही धर्माची सत्यता आहे.

« PreviousChapter ListNext »