Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || चार || 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बुद्धांचे सारे तत्त्वज्ञान यात आले. टी. एस. हक्स्लेला तर बुद्धधर्मात आशा वाटते. तो लिहितो, ‘जो धर्म पाश्चिमात्य अर्थाने ईश्वर मानीत नाही, जो धर्म मनुष्याला आत्मा नाकारतो, जो धर्म अमृतत्वावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणा म्हणतो, जो धर्म अशा अमर जीवनाची आशा करणे पाप समजतो, प्रार्थना, यज्ञयाग इत्यादींत जो धर्म अर्थ बघत नाही, मोक्षासाठी फक्त स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा असे जो धर्म सांगतो, ज्या धर्माच्या मूळच्या विशुद्ध स्वरुपात व्रत-वैकल्ये वगैरेंचा गोंधळ नाही, ज्या धर्माने जगातील बाहुबळाची कधी मदत घेतली नाही आणि तरीही जो धर्म आश्चर्यकारक वेगाने जुन्या जगाच्या निम्म्या भागावर पसरला, आणि आजही त्या धर्माला माहीत नसलेल्या अनेक क्षुद्र भोळसट कल्पना जरी त्यात मिसळल्या असल्या, तरीही मानवजातीच्या ब-याचशा भागाचा जो धर्म अद्याप प्रभावी पंथ आहे, अशा ह्या बुद्धधर्मातच मला आशा वाटते.’ बुद्धकालीन भारतीय मनोबुद्धी जर आपण लक्षात घेऊ तर आपणास असे म्हणावे लागेल, की बुद्धधर्म जर अभावरुप असता तर बुद्धांच्या संदेशाचे स्वागत व स्वीकार होणे ही अशक्य गोष्ट होती. हिंदुस्थानातील धार्मिक वातावरणाशी ज्याचा परिचय आहे, तो असे कधीही मानणार नाही, की अभावाच्या तत्त्वज्ञानामुळे, शून्याच्या तत्त्वज्ञानामुळे, भारतात धार्मिक पुनरुज्जीवन झाले. असे शून्यमय तत्त्वज्ञान हिंदुस्थानात धार्मिक पुनरुज्जीवन करु शकणार नाही. बुद्ध जरी सर्वश्रेष्ठ देवतेला, त्या परब्रह्माला नाकारीत, तरीही काहीतरी अत्यंत उदात्त असे तत्त्व ते मानीत, असे त्यांच्या अनुयायांना वाटे. त्या परब्रह्माहूनही उच्चतर असे तत्व ते मानीत, असे त्यांच्या अनुयायांना वाटे. त्या परब्रह्माहूनही उच्चतर असे तत्त्व बुद्धांना प्राप्त झाले आहे असे त्यांचे शिष्य मानीत. इतर देवतांच्या उपासकांनी आपली पूजा देवत्वाच्या दुस-या एका स्वरुपाकडे वळविली. शिव व विष्णु या दोन महान देवतांच्या वाढीचा तो काळ होता. आणि पुढे बुद्धांनाही त्यांच्या अनुयायांकडून देवत्व दिले गेले. बुद्धांचे अनुयायी निरश्वरतेकडे झुकणारे खात्रीने नव्हते.

बुद्धांची शिकवण तत्कालीन संदर्भात जर आपण पाहू, या दृश्य नामरुपात्मक जगाच्या पाठीमागे एखादी परम सत्यता बुद्ध मानीत असत की नाही, असा जर आपण प्रश्न करु, या दृश्य जीवात्म्याच्या पलीकडे अमर असे आत्मतत्त्व ते मानीत की नाही, असा जर प्रश्न करु, निर्वाण म्हणजे अभावात्मक कल्पना की अमर जीवनाची भावरुप कल्पना असा प्रश्न करु, तर ते अधिक मनोरंजक व बोधप्रद होईल.

« PreviousChapter ListNext »