Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || पाच || 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

।।पाच।।

बुद्धांच्या स्वत:च्या विचारानुरोधाने जर आपण पाहू, त्यांच्या काळातील प्रवृत्तींच्या अनुसार जर आपण पाहू, तर त्यांच्या शिकवणीत अज्ञेयवाद किंवा शून्यवाद पाहू जाणे योग्य नाही. बुद्धांच्या शिकवणीत याहून अन्य अर्थ पाहणे शक्य आहे. इतकेच नव्हे, तर तेच योग्यही आहे. ते जे शाश्वत साधुत्व व शिवत्व, ते जे निरपेक्ष परमपद, त्याचा जर अस्तिरुप अनुभव बुद्धांना आलेला नसता, तर या नाशिवंत भंगुर मानवी जीवनातील उणिवांचा जो गंभीर खोल अनुभव त्यांना आला तोही येणे अशक्य होते. अशाश्वताचे ज्या प्रकारचे दर्शन बुद्धांना झाले, तसे होणे अशक्य आहे. शाश्वताच्या महान अनुभवाच्या पार्श्वभूमीवरच सापेक्ष व विनाशी अशा जगाची कल्पना नीट येऊ शकते. त्या निरुपाधिक व शाश्वत सत्यचे वर्णन बुद्ध नेति नेति रीतीनेच करतात किंवा अजिबात टाळतात. याचा अर्थ एवढाच, की त्या परम सत्यचे वर्णन करणे वाणीच्या पलीकडचे आहे. ते परम सत्य सर्व कल्पनांच्या, विचारांच्या अतीत आहे. ज्याची ज्याची आपण निश्चित कल्पना करु शकतो अशा वस्तूमात्राच्या पलीकडे ते आहे. अद्वैत वेदांताचे जे परब्रह्म किंवा ख्रिस्ती गूढवादी संतांचा जो परमेश्वर, त्याहून बुद्धांचे निर्वाण निराळे करणे कठीण आहे. अशा त्या शाश्वत सत्यच्या थोर अधारावरच बुद्ध हे जगाचे अनुभव तुच्छ ठरवितात. परंतु जगत् तुच्छ मानायला लावणारा जो तो शाश्वत सत्यचा अनुभव, त्याचे वर्णन करायला बुद्ध नाकारीत. कारण प्रत्यक्ष पुराव्याने ती गोष्ट सिद्ध करणे अशक्य असे. तर्कातीत अशी ती वस्तू आहे. भारतीय मनोबुद्धीला त्या परमश्रेष्ठ सत्याच्या साक्षात्काराचे वर्णन करताना मुके राहणे श्रेयस्कर वाटते. त्या दिव्य अनुभवाला, त्या परम सत्याला, तर्ककर्कश व्याख्येत बसविणे, तर्काच्या क्षेत्रात आणणे ही गोष्ट करताना कदाचित क्वचित उपनिषदे दिसतील. काही थोर आचार्यही या सत्स्वरुपाचे अत्यंत सूक्ष्म असे वर्णन देऊ बघतात. परंतु बुद्धांनी अशा प्रयत्नांचा संपूर्णपणे त्याग केलेला आहे. ते दुसरे धर्माचार्य एका टोकाला, तर बुद्ध दुस-या टोकाला. अत्यंत तेजस्वी प्रकाश छायेची किंमत उपेक्षितो. बुद्धांनी दिलेली कारणे समजण्यासारखी आहेत. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात हिंदुस्थानात निर्भय विचार मांडले जात होते, प्रखर भाषा बोलली जात होती, शेकडो प्रकारचे धार्मिक अनुभव सांगण्यात येत होते. मानवजातीच्या इतिहासात विचारांची अशी निर्भयता, वाणीची अशी स्पष्टता व तीव्रता, व धार्मिक अनुभवांची अशी अपार विविधता क्वचितच कोठे आढळते. बुद्धांच्या काळात धर्मभोळेपणाही होता. वितंडवादही होता. समाजात अंधश्रद्धाही होती, प्रखर बुद्धिवादही होता. अज्ञानी लोकांचा भोळसटपणा व विद्वानांचे वितंडवादी पांडित्य यात स्पष्ट रेषा काढणे कठिण झाले होते. सारा गोंधळ होता. अशा त्या गोंधळाच्या काळात बुद्ध मानवी अनुभव व स्वभाव नीट पारखून घ्या असे म्हणत. केवळ आप्तवाक्य म्हणून काही मानू नका, उगीच विश्वास ठेवू नका. बुद्धीला जो पटवील त्याचा अधिकार. ज्याला अंतर्दृष्टी आहे, जो खोल बघतो, तो अधिकारी. प्रत्यक्षाचा खोल अनुभव जो घेतो, अंतर्भेदी दृष्टीने प्रत्यक्षात जो पाहतो, त्याला मानवी स्वभाव कळतो. ज्याने सांगितलेले आपणास पटते, त्याच्यासमोर आपण नमतो.

« PreviousChapter ListNext »