Bookstruck

पाखराची गोष्ट 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. दूर दूर असलेल्या एका देशातील ही गोष्ट आहे. एक होता शेतकरी. त्याचे नाव होते खंडू. खंडूची बायको होती. तिचे नाव चंडी. चंडी नावाप्रमाणेच खरोखर होती. जणू त्राटिकेचा अवतार. ती सदा संतापलेली असायची. डोळे तारवटलेले, कपाळाला सतराशे आठ्या. घरात अक्षयी तिची आदळआपट चालायची.

खंडूला वाईट वाटे; परंतु काय करणार? घर सोडून जावे असे त्याला वाटे; परंतु तेही बरोबर नाही असे त्याची सदसद्विवेकबुद्धी सांगे. ‘तुझी गाठ पडली आहे खरी अशा बायकोशी. आता भिऊन पळू नकोस. सहन कर सारे.’ असे सदसद्विवेकबुद्धी म्हणे.

चंडी खंडूजवळ कधी एकही शब्द गोड बोलत नसे. ती सदैव त्याच्या अंगावर ओरडायची, त्याला शिव्या द्यायची, हातात लाकूड घेऊन मारायला यायची. प्रत्यक्ष मारीत नसे एवढेच. शेजारीपाजारी तरी का खंडूला सहानुभूती दाखवीत होते? नाही. तेही हसत, थट्टा करीत.

कोंबडा आरवताच खंडू उठे. तो शेतावर जाई. चंडी त्याला काहीसुद्धा न्याहारीला देत नसे. ना थोडी चटणीभाकर, ना मूठभर पोहे. बारा वाजेपर्यंत उपाशी पोटी तो शेतात काम करी. नंतर भुकेलेला तो घरी येई.

‘आला मेला घरी. इतक्यात कशाला आला? का मरत होता उन्हात? मोठा नाजूक की नाही? नखरे करायला हवेत मेल्याला. अजून भाकर भाजून नाही झाली, तो आला गिळायला. बसा ओसरीत आता. हे दाणे निवडा. नीट निवडा. खंड्या, अरे तुला सांगत्ये मी. घे ते सूप व निवड दाणे. खडादगड पाहून ठेव. नवरोजी झालाय नुसता छळायला.’


असे सारखे तिचे तोंड सुरू असायचे. खंडू घरी दमून भागून आल्यावरही चंडी जे काम सांगे ते तो निमूटपणे करी. मग जी जाडीभरडी कोरडी भाकर चंडी वाढी ती तो खाई.

‘कोरडी भाकर कशी खाऊ?’ तो म्हणे.

‘तर काय बासुंदी आणू? श्रीखंड आणू? भिकारी तर आहे मेला; परंतु ऐट आणतो राजाची. म्हणे कोरडी कशी खाऊ? मला जात नाही कोरडी म्हणून माझ्यापुरते थोडे कालवण केले आहे. तुला रे काय झाले? भरपूर काम करीत नाहीस वाटते शेतात? ज्याला भूक चांगली लागते त्याला चार दिवसांचे शिळे तुकडेसुद्धा साखरेवाणी गोड लागतात. म्हणे कोरडी भाकर कशी खाऊ? घशाखाली जात नाही वाटते? जरा मुसळ सारा घशात व भोक मोठे करा घशाचे. मी म्हणून ताजी भाकर तरी देत्ये करून. दुसरी कोणी सटवी असती, तर चार दिवस तुला उपाशी ठेवती, शिळे खायला घालती. आपले पाय चेपायला लावती. खा कोरडी भाकर. सुखाची मिळते आहे भाकर तीसुद्धा उद्या देव देणार नाही, जर असे कुरकुराल तर.’ असे ती म्हणे.

« PreviousChapter ListNext »