Bookstruck

पाखराची गोष्ट 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘रोजच्यासारखा वेळेवर मी येत होतो; परंतु माझा तो मानव मित्र आज येथे आला आहे. त्या झाडाखाली बसला आहे. त्याच्याजवळ मी बोलत होतो. म्हणून मला उशीर झाला. चला. तुम्हाला मी तो दाखवतो. माझ्यावर त्याचे किती प्रेम. मला शोधीत शोधीत तो आला. आज आधी त्याला जेवण. चला सारी. करू त्याचे स्वागत. येता ना?’ पाखराने विचारले.

‘हो बाबा, चला.’ पिले म्हणाली.

‘चला. मीही त्याला पाहीन.’ बायको म्हणाली.

ते पाखरू निघाले. बरोबर पिले होती. पत्नीही आली. सारी त्या खंडूजवळ आली. पिले नाचू लागली. पत्नीने प्रणाम केला.

‘ही माझी पत्नी, ही माझी पिले.’ पाखरू म्हणाले.

‘वा! आनंदी आहे तुझे कुटुंब.’ खंडू म्हणाला.

‘माझी पत्नी गोड बोलते, मी घरी येताच माझे स्वागत करते. पिले माझ्याभोवती नाचतात. मी त्यांना गोड गाणी शिकवतो. म्हणा रे गाणी. बाळांनो, सोनुकल्यांनो, म्हणा गाणी, खंडूचे स्वागत करा.’ पाखराने सांगितले.

पिले गाऊ लागली. मानवी वाणी असलेल्या त्या पाखरानेच ती गाणी रचली होती. सुंदर अर्थाची गाणी. काय होता त्यांत अर्थ?

‘जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालील. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारे गाणी गातील. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तरी वाईट नका वाटून घेऊ. या निसर्गाकडे पाहा व आनंदी राहा.’

‘आनंद आनंद! हृदयात आनंद असला म्हणजे मन कसे हलके होते! ते मग चिखलात न पडता उंच उंच उडते. देवाजवळ जाते. हसा व देवाजवळ जा. आनंदी व्हा व प्रभूजवळ जा.’

‘दु:ख? होय. दु:ख आहे; परंतु ते का आहे? आपणच ते निर्मितो व मग रडतो. चला, दु:ख दूर करू. सर्वांजवळ गोड बोलू. सारे मिळून खाऊ, सारे मिळून राहू. भांडण नको, मत्सर नको. आपल्यासारखेच सारे सर्वांना द्या. झाडे आपली फळे देतात. मेघ आपले पाणी देतात. फुले आपली सुगंध देतात. सूर्य प्रकाश देतो. आपणही देऊ. सारे सुखी राहू. म्हणजे मग आनंद होईल!’

« PreviousChapter ListNext »