Bookstruck

आवडती नावडती 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दाट जंगल समोर होते. त्या जंगलातून ती चालली. जाता जाता काय मला झाली, नावडती ज्या पायवाटेने जात होती, तिच्या जवळच एक तुळशीचा माडा उगवलेला होता. नावडतीचे त्या तुळशीच्या माडयाकडे लक्ष गेले जाणार्‍यायेणार्‍यांनी त्या तुळशीची पाने ओरबाडून खाल्ली होती. ते तुळशीचे झाड दीनवाणे दिसत होते. ती नावडती त्या तुळशीजवळ गेली व तिला नमस्कार करून म्हणाली, 'जय आई तुळसादेवी, तुला वाटेच्या वाटसरूंनी ओरबाडून खाल्ले. तुझी पानांची संपत्ती त्यांनी सारी लुटली; परंतु तुला कोणी पाणी घातले नाही, तुझ्या उघडया मुळांवर कोणी माती लोटली नाही. थांब हो. मी घालते मुळाशी माती, मी देत्ये तुला पाणी-'असे म्हणून नावडती आजूबाजूला पाणी पाहू लागली. एक लहानसा ओढा खळखळ करीत वहात होता. पळसाच्या पानांचा नावडतीने द्रोण केला. त्या द्रोणाने तिने पाणी आणून त्या तुळशीला घातले. आजूबाजूचे रान उपटून तुळशीच्या मुळाशी तिने माती घातली. नंतर तिला नमस्कार करून ती नावडती पुढे निघाली.

मनात विचार करीत ती चालली होती. भेटेल एखादे तळे, दिसेल एखादी नदी, असेल मोठा डोह, त्याच्यात जीव देऊ असे मनात म्हणत ती जात होती. तो काय झाले, तिला एक देवकापसाचे झाड दिसले. देवकापूस छान असतो, त्याचा धागा सुंदर दिसतो. बायका वाती वगैंरे बहुधा या कापसाच्या करतात. म्हणून याला देवकापूस म्हणतात. त्या देवकापशीवरची बोंडे जाणार्‍यायेणार्‍यांनी तोडून नेली होती. त्या झाडाची ती शुभ्र पांढरी दौलत सर्वांनी लुटली; परंतु त्याची काळजी कोणी केली नाही. ना घातली मुळाशी मुठभर माती, ना घातले थेंबभर पाणी. सारे फुकट घेणारे. नावडती त्या झाडाजवळ गेली. जगात सहानुभूती जर मिळाली नाही, कोणी विचारपूस केली नाही, तर जिणे कसे असहय होते, त्याचा तिला अनुभव होतो. ती त्या कापशीच्या झाडाजवळ गेली व म्हणाली, 'उगी, रडू नको कापशीच्या झाडा. मी घालते हो तुला पाणी, मी घालते मुळाशी माती.’ असे म्हणून तिने त्याला पाणी घातले, मातीही घातली. नंतर ती पुढे गेली.

ती आता अधीर झाली होती. अजून कसे आढळत नाही एखादे तळे, एखादी विहीर, एखादा नदीचा डोह असे म्हणत होती. तो वाटेत एक पेरूचे झाड दिसले. येणार्‍याजाणार्‍यांनी त्याचे पेरू नेले होते, खाल्ले होते. नीट पिकण्याचीही कोणी वाट बघत नसत. मारीत दगड. पाडीत पेरू. पाखरांनाही पेरू राहात नसत. कारण पाखरे पेरू पिकला म्हणजे खातात; परंतु माणसाला कुठला धीर. तो आधीच खाऊन टाकी. पाखरे म्हणत, 'हा मनुष्य प्राणी सार्‍या दुनियेचा हावरा दिसतो. भारीच आधाशी सर्वभक्षक आहे.’ परंतु ही नावडती तशी नव्हती. ती त्या पेरूच्या झाडाजवळ गेली व म्हणाली, 'पेरूच्या झाडा, कोणी तुझी विचारपूस केली नसेल, पाणी घातले नसेल; मी घालते हो तुला पाणी, घालते मुळाशी माती.’ तिने त्याप्रमाणे केले व ती पुढे गेली.

ते दाट जंगल संपले व मोकळे मैदान सुरू झाले. सूर्य बराच वर आला होता. आता पायही भाजू लागले; परंतु इतक्यात एक मोठे तळे दिसले. तळेकसले, ते सरोवरच जणू होते. सुंदर कमळे फुलली होती. पाण्यावर मंद लाटा नाचत होत्या. पाण्यात हंस वगैरे पक्षी नावांप्रमाणे डोलत होते. त्या सरोवरला एक बाजूला घाटही बांधलेला होता. नावडती त्या घाटावर जाऊन उभी राहिली. तिचा निश्चय झाला. तिने पदर बांधला. ती आता पाण्यात उडी घेणार तोच 'हे अभागी जीवा, थांब, असा जीव देऊ नकोस. 'असे शब्द तिच्या कानांवर आले.

« PreviousChapter ListNext »